ऐन दुष्काळात शेतमालास भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो फेकण्याची वेळ ओढवली आहे. राज्य शासन शेतकऱ्यांना पाच हजारांची तुटपुंजी मदत करत असल्याने त्यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे रविवारी नाशिकमध्ये ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोमॅटो फेकत वंचितच्या कार्यकर्त्यांनी राज्य शासनाचा निषेध नोंदविला. सरकारने कुंभमेळ्यासाठीचा ३५ हजार कोटींचा निधी दुष्काळासाठी खर्च करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
## शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
संपूर्ण दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी त्वरित जाहीर करावी, सर्व बाधित पिकांची हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची मोफत व सुरळीत व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. दलित आदिवासी वस्त्यांमध्ये विशेष आणि स्वतंत्र नळ योजना मंजूर करावी, अशीही मागणी आहे.
सहकार, बँक आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्ती आणि वसुली बंद करण्यासाठी शासन निर्णय काढून दिलासा द्यावा, ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व टॅक्स रद्द करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. विद्यार्थी, कामगार, पेंटर, कंत्राटी मजूर व तृतीयपंथी, अनाथ, एकल महिला, विधवा महिला, निराधार, भटके विमुक्त, कामगार मजूर आणि स्थलांतरितांसाठी विशेष अर्थसाहाय्य व सुरक्षा योजना राबवण्याची मागणीही करण्यात आली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply