नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात शंभर टक्के सहभाग नोंदवून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले आहे. अभियानातील सर्व घटकांवर लक्ष केंद्रित करून ग्रामपंचायतींनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेत ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. याहामोगी सभागृहात आयोजित या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.
आठ घटकांवर मार्गदर्शन
उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. ‘जलसमृद्ध हरित गाव’ हा अभियानाचा महत्त्वपूर्ण घटक असून, नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. गावातील जलस्रोतांचे संवर्धन, पाणी साठवण, पावसाच्या पाण्याचे नियोजन, जलपुनर्भरण, लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. जलसमृद्ध गावाच्या संकल्पनेतून दुष्काळावर मात करून गावांना शाश्वत जलसुरक्षा प्रदान करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यशाळेत अभियानाच्या आठ घटकांवर विषयानिहाय मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध हरित गाव, अभिसरण योजना, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम या विषयांचा समावेश होता. विभागप्रमुख तसेच गटविकास अधिकारी यांनी विषयानुरूप मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत अधिकारी मुकेश कापुरे यांनी सूत्रसंचालन केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply