फटाक्यांच्या पाकिटांवर त्यांची ध्वनिपातळी, रासायनिक घटक आणि क्यूआर कोडची माहिती देणे बंधनकारक असतानाही बाजारात विकल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या बॉक्सवरील माहितीच अविश्वसनीय असल्याचा गंभीर मुद्दा आवाज फाउंडेशनने उपस्थित केला आहे. काही फटाक्यांच्या पाकिटांवर क्यूआर कोड नसतात, तर काहींवर बनावट क्यूआर कोड आढळले आहेत. एवढेच नव्हे, तर स्वतंत्र रासायनिक चाचण्यांमध्ये बंदी असलेल्या आणि आरोग्यास घातक अशा बेरियमचा अंश आढळल्याचा दावा फाउंडेशनने केला आहे. त्यामुळे केवळ फटाक्यांच्या आवाजावर नव्हे, तर त्यातील रासायनिक घटक आणि उत्पादनांच्या लेबलवरील माहितीच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्र्यांना पत्र; चाचणी अहवाल सादर
आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलअली यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले आहे. मुंबईतील बाजारातून ३ नोव्हेंबर रोजी खरेदी केलेल्या फटाक्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने ५ नोव्हेंबर रोजी ध्वनिपातळी तपासण्यात आली. या चाचण्यांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. यापूर्वी २०१२ पासून फाउंडेशनकडून फटाक्यांमधील रसायने आणि जड धातूंची स्वतंत्र तपासणी केली जात आहे. प्रत्यक्ष चाचण्यांतील निष्कर्ष आणि पाकिटांवर नमूद केलेले रासायनिक घटक यांत तफावत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
आवाज कमी, पण फटाके सुरक्षित नाहीत
दरम्यान, २००६ मध्ये फटाक्यांच्या चाचणीत १४४.९ डेसिबलपर्यंत आवाज नोंदवला गेला होता. २०२६ मध्ये ही कमाल पातळी ९३ डेसिबलपर्यंत खाली आली आहे. मात्र, आवाज कमी झाला म्हणून फटाके पूर्णपणे सुरक्षित ठरत नाहीत, असे फाउंडेशनचे म्हणणे आहे. मुंबईतील ११० शांतता क्षेत्रांत फटाके फोडण्यास मनाई असून रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत सर्वच क्षेत्रांत फटाके फोडता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीपासून प्रत्यक्ष वापरापर्यंतच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फटाक्यांवर कारवाई करावी, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा समोर आल्याने फटाके खरेदी करताना ग्राहकांनीही बॉक्सवरील माहिती आणि क्यूआर कोड तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply