शास्त्रीय संगीताचा गोडवा, चित्रपटगीतांची लोकप्रियता, संतवाणीचा भक्तिरस आणि सुफी संगीताची अनुभूती अशा विविध सुरेल रंगांची उधळण करीत परिवर्तन संस्थेतर्फे आयोजित ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम रविवारी जळगावातील भाऊंच्या उद्यानात उत्साहात झाला. सकाळच्या या सुरेल मैफलीत रसिकांनी भरभरून दाद दिली.
मान्यवरांच्या उपस्थितीत सुसूंद्री आणि फुलबाजा पेटवून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, डॉ. सोनाली महाजन, डॉ. राहुल महाजन, अमर कुकरेजा, नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे आणि अनिल कांकरिया उपस्थित होते. खासदार वाघ यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आगामी दुष्काळी संकटाचा विचार करून पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले. आमदार भोळे यांनी ‘अंत्योदयाची दिवाळी’ या संकल्पनेचे महत्त्व विशद केले.
संतवाणीने सुरुवात, भैरवीने सांगता
संत एकनाथ महाराज यांची ‘संत भार पंढरीत’ ही रचना वैष्णवी केऱ्हाळे हिने सादर करून संगीत मैफलीची सुरुवात झाली. त्यानंतर संत मीराबाई यांची ‘एक राधा, एक मीरा’ ही रचना चारुल पाटील यांनी सादर केली. गोपाल ठाकरे, वैष्णवी आणि चारुल पाटील यांनी लाल इश्क आणि यमन रागाचा सुरेल संगम साधत ‘मेरा इश्क, तेरा इश्क, ये लाल इश्क’ हे गीत सादर केले.
‘दमादम मस्त कलंदर’ या सुफी रचनेने मैफलीत वेगळाच रंग भरला. ‘काहे छेड मोहे’ आणि ‘झुकी झुकी सी नजर’ या गझलेनंतर चारुल पाटील हिने सादर केलेल्या ‘तुझ्या उसाला लागलं कोल्हा’ या लावणीला रसिकांची भरभरून दाद मिळाली. चारुल आणि वैष्णवी यांनी ‘मोहे रंग दो लाल’ सादर केल्यानंतर प्रेक्षकांनी वन्स मोअरची मागणी केली. ‘हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही’ या भजनाने भक्तिरसाची अनुभूती दिली. पुणे येथील डॉ. कुंदन इंगळे यांनी ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील ‘मन उधाण वाऱ्याचे’ हे लोकप्रिय गीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘आगा वैकुंठीच्या राया’ या भैरवीने कार्यक्रमाची सुरेल सांगता झाली.
सात वर्षांच्या शिष्याची संगीतसाथ
‘शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपटगीते’ ही भूषण गुरव यांची संकल्पना या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली. सात वर्षांचा शिष्य करण नाले आणि त्याचे गुरु शिवम चक्रवर्ती यांनी सिंथेसायझरवर संगीतसाथ दिली. दर्शन गुजराथी यांनी ऑक्टोपॅड, तर राजेंद्र माने यांनी हार्मोनियमची साथ केली. हर्षल पाटील यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रम उंचीवर गेला. निर्मिती प्रमुख म्हणून नारायण बाविस्कर आणि विनोद पाटील यांनी जबाबदारी सांभाळली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply