राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम केला आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्याच घरी त्यांनी जेवणही केले.
बावनकुळेंचा मुक्कामही त्याच गावात
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्याच गावात नंदूजी लोहे या शेतकऱ्याच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. बावनकुळे लोहे कुटुंबाच्या घरी मुक्कामी थांबले होते. तिथे रात्रीच्या जेवणाला उशीर झाला.
दुसऱ्या घरी जेवण्यास नकार
जेवणानंतर त्याच गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम ठरला होता. मुख्यमंत्र्यांचे जेवण आटोपल्यानंतर संवाद कार्यक्रमाची वेळ झाली, पण बावनकुळे यांचे रात्रीचे जेवण अद्याप झाले नव्हते. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी त्यांना दुसऱ्या घरात जेवण करण्याचा सल्ला दिला. मात्र बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका घेतली की, ज्या शेतकऱ्याने मला घरी राहायला जागा दिली, त्याच्याच घरी मी जेवणार. जेवणाला उशीर झाला म्हणून दुसऱ्या घरी जेवणे त्यांना पटले नाही. ज्या शेतकऱ्याने इतक्या आत्मीयतेने सर्व काही केले, त्याच्या प्रेमाला आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली.
शेतकरी संवाद कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज स्वीकारले आणि अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर ते परत नंदूजी लोहे यांच्या घरी पोहोचले. रात्रीचे ११.१५ वाजले होते. त्यांनी लोहे कुटुंबासोबत जेवण केले आणि अत्यंत साधेपणाने दिवाळी साजरी केली.
भोसलेही शेतकऱ्याच्या घरी
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी सांगोला तालुक्यातील इटकी येथील शेतकरी पोपट सावंत यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी फराळ आणि आहेर देत सावंत कुटुंबीयांशी संवाद साधला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply