नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे दिवाळी साजरी करण्याची एक वेगळीच परंपरा गेली दहा वर्षे सुरू आहे. येथील स्मशानभूमीत दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. वसुबारसपासून स्मशानभूमीचा परिसर रंगीत दिव्यांच्या रोषणाईने, आकर्षक रांगोळीने आणि आकाशकंदिलांनी सजवला जातो. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला येथे विद्युत रोषणाई करण्यात आली.
भीती आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न
स्मशानभूमीबद्दल प्राचीन काळापासून लोकांच्या मनात अनेक भीती आणि अंधश्रद्धा निर्माण झाल्या आहेत. मात्र विज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असून जुन्या अंधश्रद्धांना आता जागा उरलेली नाही, अशी भावना या उपक्रमामागे आहे. याच जाणिवेतून पिंपळगावकर गेली दहा वर्षे दिवाळीच्या काळात स्मशानभूमी सुशोभित करत आहेत. स्मशानभूमीविषयीच्या भीती आणि पूर्वग्रह दूर व्हावेत, हाच या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार यांनी सांगितले.
परवानगीने सजावट, स्वच्छतेची तयारी
हा उपक्रम सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या परवानगीने राबवला जात असे; सध्या नगरपरिषदेच्या परवानगीने तो सुरू आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निफाड रस्त्यावरील पिंपळगाव बसवंत-बेहेड फाट्याजवळील पाराशरी नदीकाठच्या स्मशानभूमीची स्वच्छता केली जाते. त्यानंतर विद्युत रोषणाईसह आकाशकंदील लावून स्मशानभूमी सुशोभित केली जाते. या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार पुढाकार घेतात. त्यामुळे लक्ष लक्ष दिव्यांनी स्मशानभूमीचा परिसर उजळून निघतो.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply