इंधनाचे वाढते दर आणि ग्राहकांची बदललेली आवड यामुळे नाशिकमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे. नामांकित कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनासाठी तब्बल तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. जून-जुलैमध्ये नोंदणी केलेल्या ग्राहकांना दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन मिळण्याची पर्वणी साधली जात आहे.
रविवारी, ८ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन तर मंगळवारी, १० नोव्हेंबर रोजी पाडव्याच्या निमित्ताने होणारी वाहन खरेदी लक्षात घेऊन कंपन्यांची दालने सजली आहेत. शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा विकसित झाल्या असून बचतीच्या दृष्टीने ही वाहने किफायतशीर वाटत असल्याने त्यांच्याकडे ओढा वाढत आहे.
दुचाकी खरेदीत ३० ते ४० टक्के वाटा
दुचाकी वाहनांमध्ये एकूण खरेदीच्या सुमारे तीस ते चाळीस टक्के वाटा इलेक्ट्रिक वाहनांचा आहे. मागणी मोठी असली तरी तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे नावनोंदणीनंतर ग्राहकांना साधारण तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागते. नामांकित कंपन्यांबरोबरच स्थानिक स्तरावर तयार होणारी इलेक्ट्रिक वाहने असे अनेक पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सीएनजी आणि हायब्रीडकडेही कल
चारचाकी वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या जोडीला सीएनजी आणि हायब्रीड पद्धतीच्या वाहनांकडे खरेदीचा कल वाढला असून डिझेल वाहनांच्या खरेदीत काही प्रमाणात घसरण झाली आहे. वाहन खरेदी केल्यानंतर सजावटीसाठीही गर्दी दिसत आहे. चारचाकी वाहनांसाठी शिंगाडा तलाव परिसरात विविध साधनसामग्रीची विक्री होते, तर दुचाकींच्या साधनसामग्रीची विक्री खडकाळी सिग्नल ते सारडा सर्कल दरम्यानच्या रस्त्यावरील दुकानांमध्ये सुरू आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply