जिल्ह्यातील विविध बँका, आरबीआय नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्था तसेच मायक्रोफायनान्स संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात कर्जवसुलीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण, धमकावणे तसेच अडवणूक करण्यासारख्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर संरक्षण मिळावे, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वतीने नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कर्जवसुलीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
कायदेशीर कारवाईची मागणी
कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, धमकावणे किंवा त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच सोशल मीडियावर कर्मचाऱ्यांविरोधात चिथावणीखोर संदेश प्रसारित करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
बँका व वित्तीय संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी हे संस्थेच्या नियमावलीनुसार आणि वरिष्ठांच्या निर्देशानुसार आपले कर्तव्य पार पाडतात. कर्जाचे व्याजदर निश्चित करणे, कर्ज मंजूर करणे अथवा संस्थेची धोरणे ठरविणे हे त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. त्यामुळे संस्थांच्या धोरणांबाबत असलेला रोष संबंधित कर्मचाऱ्यांवर काढणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध बँका, एनबीएफसी आणि मायक्रोफायनान्स संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply