रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजारांची अग्रिम मदत

नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असून ५ लाख ५७ हजारांहून अधिक शेतकरी बाधित आहेत. सरकारने पाच हजार रुपयांची अग्रिम मदत दिली आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजारांची अग्रिम मदत

खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्यानंतर रब्बी हंगामावरही पाणीटंचाईचे संकट आहे. संकटकाळात सरकारने दुष्काळग्रस्तांना दिलेली पाच हजार रुपयांची अग्रिम मदत तुटपुंजी असली तरी त्यातून शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांत नव्याने आशेचा किरण निर्माण होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

एलनिनोच्या प्रभावामुळे यंदा जिल्ह्यात पावसाने खंड दिला. पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. परिणामी जिल्ह्यातील पंधरापैकी तब्बल १३ तालुक्यांत राज्य सरकारने दुष्काळ घोषित करताना विविध प्रकारच्या उपाययोजना लागू केल्या. शेतकऱ्यांचा दिवाळी सण गोड करण्यासाठी पाच हजार रुपयांची तातडीची अग्रिम मदतही देण्यात आली आहे. पण सध्याचे संकट बघता शेतकऱ्यांना अधिक दिलासा देण्याची गरज आहे.

नुकसानीचे प्रमाण किती?

जिल्ह्यात अपुऱ्या पावसाचा ३ हजार ३०६ गावांना फटका बसला आहे. तब्बल ६ लाख ४४ हजार २८९ हेक्टरवरील मका, सोयाबीन, द्राक्ष, कांदा, भात तसेच इतर भाजीपाला आणि फळपिकांचे नुकसान झाले. परिणामी ५ लाख ५७ हजार ७०१ शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी ६५८ कोटी ६० लाख ३६ हजार रुपयांच्या अनुदानाची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर सादरही करण्यात आला आहे. अर्थात ही मदत मिळण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. या दरम्यान सरकारने पाच हजारांची तातडीची अग्रिम मदत देऊन बाधित शेतकऱ्यांचा दिवाळीचा सण गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ही मदत तात्पुरती असून बळीराजाचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी व कायमस्वरूपी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.

कायमस्वरूपी उपायांची गरज

गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीने शेतीपिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट तसेच चक्रीवादळाच्या माऱ्यामुळे शेतीपिके मातीमोल होत आहेत. परिणामी पोटच्या पोराप्रमाणे जपलेली शेती एका क्षणार्धात उद्ध्वस्त होताना पाहून बळीराजाचे हृदय पिळवटून निघते.

परंतु या घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणेच शासन-प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात मग्न असते. या दरम्यान पीक पंचनामे, कागदपत्रांचे सोपस्कार तसेच राज्यस्तरावरून मदतीची घोषणा या सर्व प्रक्रियेत महिने न् महिने व्यतीत होतात. एवढे करूनही शेतकऱ्यांच्या हाती तुटपुंज्या मदतीचा धनादेश पडतो. बँकांचे कर्ज तसेच वसुलीसाठी तगाद्याच्या ओझ्याखाली बळीराजा दिवसेंदिवस दबून जात आहे. हा दबाव सहन न झाल्याने सरतेशेवटी तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्यामुळे शासन-प्रशासन तसेच समाजाने पुढे येऊन बळीराजाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी शेतात नवनवीन प्रयोग राबवितानाच शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला पाहिजे. तरच खऱ्याअर्थाने शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाचे जीवन प्रकाशमान होईल.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance