महाराष्ट्रातील ८५ टक्के तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. गुजरात, राजस्थान आणि तेलंगणाच्या काही भागांमध्येही दुष्काळ जाहीर झाला असून दुर्गम भागांमध्ये पाणीपुरवठा करणारे टँकर पसरले आहेत. अल निनोच्या पार्श्वभूमीवर शहापूरमधील भातसा धरणाच्या कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातसा कालव्याच्या पाण्यावर अवलंबून न राहण्याचे आवाहन शासनाने केले आहे.
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य
शासनाच्या नवीन पाणी व्यवस्थापन नियमांनुसार ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच १० टक्के आपत्कालीन बफर साठा राखीव ठेवला जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना अधिक पाणी लागणाऱ्या रब्बी पिकांची लागवड न करण्याचे किंवा ती टाळण्याचे आवाहन केले आहे. भातसा धरणाच्या कालव्यातून पाणी मिळण्याची शाश्वती नसल्याने जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी कमी पाण्यावर येणाऱ्या आणि जमिनीतील ओलाव्यावर टिकणाऱ्या पिकांची निवड करण्याचे सांगण्यात आले आहे.
कमी पाण्यातील पिकांची निवड करा
कडधान्यांमध्ये हरभरा, मूग, उडीद किंवा मटकी यांची निवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गळीत धान्यांमध्ये जवस, मोहरी, करडई किंवा तीळ घेता येतील. जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासू नये म्हणून कमी पाण्यात येणाऱ्या ज्वारी किंवा बाजरीसारख्या चारा पिकांची लागवड करता येईल. शेतातील किंवा गावातील उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन ओलाव्यानुसारच पेरणीचे क्षेत्र निश्चित करावे. पाण्याचा साठा कमी असल्यास विनाकारण जास्त क्षेत्रावर पेरणी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जमिनीत जोपर्यंत पुरेसा ओलावा आहे तोपर्यंतच रब्बीची पेरणी पूर्ण करून घ्यावी, बियाणे योग्य खोलीवर पडेल याची काळजी घ्यावी आणि पिकांची घनता मर्यादित ठेवावी. हवामानातील अनिश्चितता आणि पाण्याचे संकट पाहता नुकसान टाळण्यासाठी रब्बी पीक विमा काढून पिके सुरक्षित करून घ्यावीत, असेही शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply