फॅशन शो म्हटले की डोळ्यांसमोर भव्य रॅम्प, महागडे डिझायनर कपडे आणि आकर्षक प्रकाशयोजना उभी राहते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच रॅम्पवॉक पाहायला मिळत आहे. हा रॅम्पवॉक मुंबईजवळील वसईतील भाजी मार्केटमध्ये भरला असून, मॉडेल्सनी हातात बॅग किंवा दागिन्यांऐवजी मुळा, कोथिंबीर आणि गाजर घेऊन वॉक केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
या फॅशन शोचे नाव व्हिजन व्होग फॅशन वीक असे ठेवण्यात आले होते. वसईतील अंबाडी रोडवरील गजबजलेल्या भाजी मार्केटमध्ये हा अनोखा उपक्रम सादर करण्यात आला. मुंबईतील फॅशन मेंटॉर आणि मॉडेल साहिल सिंग यांनी ही संकल्पना मांडली. पारंपरिक फॅशन शोच्या चौकटीबाहेर जाऊन रोजच्या आयुष्यात दिसणाऱ्या वस्तूंचाही फॅशनमध्ये वापर करता येतो, हे दाखवणे हा त्यामागील उद्देश होता.
अरुंद गल्ल्यांमधून आत्मविश्वासाने कॅटवॉक
या रॅम्पवॉकमध्ये तरुण आणि तरुणी अशा दोन्ही गटांतील मॉडेल्स सहभागी झाले होते. भाजी मार्केटमधील अरुंद गल्ल्यांमधून ते आत्मविश्वासाने कॅटवॉक करताना दिसले. त्यांच्या आजूबाजूला भाजी विक्रेते, दुकाने आणि खरेदीसाठी आलेले ग्राहक तिथेच होते आणि त्यातच हा रॅम्पवॉक सुरू होता. कोणाच्या हातात मुळा होता, तर कोणाच्या हातात कोथिंबीरीची जुडी दिसत होती. काहींनी तर बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर पेहरावासाठीही केला होता.
या उपक्रमात व्हिजन व्होग अकॅडमीच्या सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या संकल्पनेमागे साहिल सिंग यांच्यासोबत कॅरिसा डी ब्रिटो, रोहित चौधरी आणि जतिन गामी हेही सहभागी होते. या फॅशन शोचा व्हिडिओ साहिल सिंग यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, व्हिडिओमध्ये पहाडी गाण्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे गाण्याला वेगळाच देसी रंग मिळाला आहे.
महागडा मंच नसला तरी फॅशन शक्य
महागडे कपडे किंवा भव्य मंच नसला तरी कल्पना आणि आत्मविश्वासाच्या जोरावर फॅशन सादर करता येते, हे या उपक्रमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजी खरेदीसाठी गजबजणाऱ्या मार्केटमध्ये अचानक सुंदर रॅम्पवॉक पाहायला मिळाल्याने हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply