छत्रपती संभाजीनगर शहरातील भाजीपाला बाजारात सध्या आवक मुबलक आहे. त्यामुळे बहुतांश भाज्यांचे भाव स्थिर राहिले आहेत. काही भाज्यांच्या भावात किलोमागे १० ते २० रुपयांची घट झाली आहे. जाधववाडी भाजीमंडईतील ठोक बाजारात टोमॅटो, भोपळा, कोबी, फ्लॉवर, वांगे आणि काकडीची आवक वाढल्याने किरकोळ बाजारात भाव काहीसे उतरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे कांदा, लिंबू, लसूण आणि शेवगा यांना मात्र अधिकचा भाव मिळत आहे.
किरकोळ बाजारातील आजचे भाव
औरंगपुरा, गुलमंडी, शहागंज, टीव्ही सेंटर आणि मुकुंदवाडीसह शहरातील किरकोळ बाजारात बटाटे ३० रुपये किलो आणि कांदा ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. भोपळा ६० रुपयांवरून ४० रुपये, काकडी ६० वरून ५० रुपये आणि टोमॅटो ५० वरून ४० रुपये किलो झाला आहे. वांग्याचा भाव ८० वरून ६० रुपये, कोबी ६० वरून ४० रुपये, तर फ्लॉवर ८० वरून ६० रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. अद्रक २४० रुपयांवरून २०० रुपये किलो झाली आहे. भेंडी, गाजर, कारले, वाल, गिलके, हिरवी मिरची, सिमला मिरची आणि दोडके प्रत्येकी ८० रुपये किलो दराने मिळत आहेत. दिलपसंद १०० रुपये, शेवगा आणि श्रावण घेवडा १२० रुपये, तर कंटुले २०० रुपये किलो आहेत. लिंबू २०० रुपये किलो असून लसणाला २०० ते ४०० रुपये किलोचा भाव मिळत आहे.
पालेभाज्यांची आवक वाढली, भाव स्थिर
बाजारात पालेभाज्यांची आवक काहीशी वाढली असून त्यामुळे त्यांचे भावही स्थिर आहेत. मेथी, चुका, पालक, तांदुळजा आणि शेपू या पालेभाज्या १५ रुपये जुडी, तर कोथिंबीर २० रुपये जुडीने विकली जात आहे. एकूणच भाजीपाल्याच्या बाजारात भाव स्थिर असून काही भाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply