जळगाव जिल्ह्यात सध्या हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. दिवसा उन्हाचा चटका लागत असतानाच आकाशात ढग जमा होत आहेत, तर रात्री दहा वाजल्यानंतर तापमानात घट होऊन गारवा जाणवू लागला आहे. दिवसाची उष्णता आणि रात्रीचा थंडावा, अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव जिल्ह्यातील नागरिक घेत आहेत.
पुढील काही दिवसांत तापमान घटण्याची शक्यता
अर्णब वादळामुळे काही भागांत जोरदार पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांपासून सकाळी ढगाळ वातावरण तयार होत असून दुपारी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. दिवसा अधूनमधून ढग येत असल्याने उन्हाचा जोर काहीसा कमी होतो. पुढील तीन ते चार दिवसांत कमाल आणि किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून, त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका कमी होईल आणि रात्री व पहाटे थंडीचा गारवा वाढेल, असा अंदाज आहे. जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम
दिवसा ऊन, अधूनमधून ढग आणि रात्री गारवा अशा चढ-उताराच्या स्थितीमुळे नागरिकांना हवामानातील बदल प्रकर्षाने जाणवत आहेत. सकाळी आणि रात्री घराबाहेर पडताना थंडावा जाणवत आहे. वातावरणातील या बदलाचा शरीरावर परिणाम होत असून, त्यामुळे आजारही पसरत आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply