दुष्काळी भागात पाणी अडवण्यासाठी श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या पेठ तालुक्यातील घनशेत आणि पळशी (गावंध) येथील वाहत्या नाल्यांवर प्रत्येकी दोन असे एकूण चार वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांना ‘यशवंत वनराई बंधारा’ असे नाव देण्यात आले आहे.
उन्नत भारत अभियानांतर्गत सामूहिक प्रयत्न
उन्नत भारत अभियानांतर्गत विद्यापीठातील ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखा आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने या बंधाऱ्यांचे काम सुरू करण्यात आले. विद्यार्थी स्वयंसेवक, स्थानिक ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, कृषी विभाग आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे बंधारे उभारण्यात आले. दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांच्या हस्ते या बंधाऱ्यांचे उद्घाटन झाले. यावेळी पेठ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, पळशी (गावंध) चे सरपंच धनराज ठाकरे, घनशेतच्या सरपंच शांता चौधरी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ओंकार गावित आणि ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखेचे संचालक प्रा. कैलास मोरे उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी नंदू गायकवाड, सुरेश पखाने, विनायक महाले, कैलास चौधरी, मीराबाई गावित आदीही यावेळी उपस्थित होते.
पाणी हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यापीठाच्या ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखेचे शैक्षणिक संयोजक डॉ. दीपक सोनवणे, गोकूळ टोंगारे आणि गणेश उमाळे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, येत्या काळात शेती, पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे संवर्धन, साठवण आणि नियोजन हेच सध्याचे सर्वोच्च प्राधान्यक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply