भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून धुळ्यात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. राजवाडे संशोधन मंडळाच्या ग्रंथालयातर्फे झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धुळे शहरातील विविध शाळांमधून सुमारे २०० निबंध प्राप्त झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आणि अभ्यासपूर्ण मांडणीने परीक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते झाला.
राजवाडे संशोधन मंडळाच्या वस्तुसंग्रहालय दालनात बक्षीस वितरण समारंभ पार पडला. मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा अध्यक्षस्थानी होते. संशोधन अधिकारी मृदुला वर्मा आणि संशोधक संपादक प्राचार्य डॉ. अनिल बैसाणे या वेळी उपस्थित होते. ग्रंथालय सचिव जयश्री शहा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात डॉ. कलाम यांना अभिवादन करण्यात आले. ग्रंथालय लिपिक रेणुका शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर भूषण बर्गे यांनी आभार मानले. ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान
या स्पर्धेत प्रथम क्रमांक रिद्धी संदीप पाटील (जय हिंद हायस्कूल), द्वितीय क्रमांक पद्मिनी भूषण पवार (जिजामाता कन्या विद्यालय) आणि तृतीय क्रमांक सुफियान रसौद्दीन शेख (एल. एम. सरदार उर्दू हायस्कूल) यांनी मिळवला. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. परीक्षकांनी सर्व सहभागी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले. विशेषतः उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या निबंधांचे कौतुक करण्यात आले. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेत प्रभावी आणि मुद्देसूद लेखन करणे ही समाधानाची बाब असल्याचे परीक्षकांनी नमूद केले.
वाचाल तर वाचाल हा संदेश
स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे वाचनसंस्कृतीवर होणाऱ्या परिणामांबद्दल या वेळी खंत व्यक्त करण्यात आली. पुस्तक हा विद्यार्थ्यांचा खरा मित्र असून त्यातूनच ज्ञानाची आणि विचारांची समृद्धी घडते, असे सांगण्यात आले. त्यामुळे सर्वांनी ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश अंगीकारावा, असे आवाहन करण्यात आले. राजवाडे संशोधन मंडळ शताब्दी वर्षाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचेही या वेळी नमूद करण्यात आले. नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड, संशोधनाची जिज्ञासा आणि इतिहासाचा अभिमान निर्माण होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह आणि मित्रांसह या ऐतिहासिक ठेव्याला आणि वस्तुसंग्रहालयाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply