मान दुखत असेल तर अनेक जण लगेच मान मुरगळून घेण्याचा उपाय करतात. मात्र प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तीकडून जोर लावून मान मुरगळून घेणे आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते, असा इशारा कल्याणमधील डॉक्टरांनी दिला आहे. अशा उपचारानंतर दोन तरुणांना मेंदूचा स्ट्रोक झाल्याची दुर्मिळ प्रकरणे समोर आली आहेत.
मानेच्या चुकीच्या हालचालींमुळे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना इजा होऊ शकते. त्यातून स्ट्रोकचा धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे उपचार टाळावेत आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दोन वेगवेगळी प्रकरणे
पहिल्या प्रकरणात तीस वर्षीय महिलेला महिनाभरापासून मानेचा त्रास होता. तिने एका अप्रशिक्षित व्यक्तीकडून मान मुरगळून घेतली. त्यानंतर सुमारे बारा तासांनी तिला चक्कर येणे, शरीराचा तोल जाणे, काही काळ शुद्ध हरपणे आणि चेहरा वाकडा होणे अशी लक्षणे दिसू लागली. तपासणीत मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्याचे आढळले. योग्य औषधोपचारांनंतर तिची प्रकृती सुधारली आणि सहा आठवड्यांत रक्तप्रवाहही पूर्ववत झाला.
दुसऱ्या प्रकरणात सत्तावीस वर्षीय तरुणाने मानेतील वेदना आणि आखडलेपणासाठी स्थानिक उपचार घेतले. त्यानंतर त्याला तीव्र चक्कर, चालताना तोल जाणे आणि हाताला मुंग्या येणे असा त्रास सुरू झाला. तपासणीत मेंदू आणि हाताला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्यांमुळे अडथळे निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. वेळेत उपचार मिळाल्याने त्याच्या प्रकृतीतही सुधारणा झाली.
स्ट्रोकची लक्षणे दिसताच रुग्णालयात जा
फोर्टिस हॉस्पिटल कल्याणचे न्यूरो, स्पाइन आणि स्ट्रोक इंटरव्हेन्शन तज्ज्ञ डॉ. ऋषभ छेडा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन्ही रुग्णांवर उपचार केले. जागतिक स्ट्रोक दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे. स्ट्रोकच्या उपचारात प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते, असे त्यांनी सांगितले.
चेहरा वाकडा होणे, चक्कर येणे, हात-पाय कमजोर होणे किंवा चालताना तोल जाणे अशी लक्षणे दिसल्यास वेळ न दवडता रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मानेचा त्रास असल्यास स्वतःहून किंवा अप्रशिक्षित व्यक्तीकडून उपचार करून घेण्याऐवजी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply