धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक झपाट्याने घटली आहे. गेल्या वर्षी दिवाळीपूर्वीच्या काळात दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल माल येत होता, तर यंदा केवळ २०० ते ३०० क्विंटल माल येत आहे. म्हणजे आवक जवळपास ९० टक्क्यांनी कमी झाली आहे. बाजार समिती प्रशासनाने ही आकडेवारी दिली आहे.
पावसाच्या खंडाने उत्पादन घटले
जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन हे मुख्य नगदी पीक आहे. यंदा पाच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली होती. मात्र पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या टप्प्यात असताना पावसाने दीर्घ ओढ दिली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली, शेंगा नीट भरल्या नाहीत आणि अनेक ठिकाणी उभे पीक जागेवरच सुकून गेले. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली आणि काही शेतकऱ्यांना पेरणीचा खर्चही वसूल करता आला नाही.
दर वाढले, पण मालच नाही
उत्पादन घटल्याने सोयाबीनचे दर मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. सध्या बाजार समितीत प्रतिक्विंटल सहा हजार ९०० ते सात हजार १०० रुपये दर मिळत आहे. मात्र हाती पुरेसा माल नसल्याने वाढलेल्या दराचा लाभ शेतकऱ्यांना घेता येत नाही. मुबलक उत्पादन असताना दर कमी आणि दर वाढले असताना विक्रीसाठी माल नाही, अशी विचित्र कोंडी शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply