जळगावात रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाइन बँकिंग फसवणुकीपासून सुरक्षित कसे राहावे, या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ट्रेड अँड फोरेक्स डिपार्टमेंटचे सीनियर मॅनेजर जितेंद्र बरडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सायबर म्हणजे इंटरनेट हे संपर्काचे माध्यम आज प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले आहे, मात्र त्याचा वापर करताना सतर्कता आणि जागरूकता बाळगणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. मोबाईल वापरताना केलेल्या एका चुकीमुळे सायबर गुन्हेगारांना संधी मिळते आणि आपण आपली आयुष्यभराची कमाई गमवू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
फसवणुकीचे नवे प्रकार आणि आमिषे
विविध ई-मेल्स, एसएमएस, लॉटरी, टूर्स ऑफर्स, रिफंड, ट्रॅफिक दंड ई-चलन, डिस्काउंट योजना आणि नोकरीच्या आमिषांसह सायबर गुन्हेगार आज नवनवीन युक्त्या वापरत असून, त्यांचा फसवणुकीचा प्रकार डिजिटल अरेस्टपर्यंत पोहोचला आहे, असे बरडे यांनी सांगितले. नागरिक मात्र आजही सहज पैशाच्या नादात किंवा जाहिरातींच्या मोहात सायबर गुन्हेगारांचे बळी ठरत आहेत. कोणत्याही अनोळखी कॉल, मेसेज, ई-मेल किंवा जाहिरातीतील लिंकवर क्लिक करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. अशी लिंक उघडल्यास छुप्या पद्धतीने विविध ॲप डाऊनलोड होतात आणि गुन्हेगार बँक खात्यातून रक्कम काढून घेतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांसाठी विशेष सावधगिरी
महिला ऑनलाइन खरेदीचा जास्त वापर करतात आणि त्यामुळे त्या सायबर गुन्हेगारांचे सहज लक्ष्य ठरतात, त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे बरडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला अध्यक्ष ॲड. केतन ढाके आणि मानद सचिव दीपक नाथानी यांची प्रमुख उपस्थिती होती. रोटरी सेंट्रलच्या सदस्यांनी परिवारासह मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply