सटाणा ते ठेंगोडा या अवघ्या आठ किलोमीटरच्या पट्ट्यात साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक तब्बल ४५ ठिकाणी खंडित झाले आहेत. खासगी शाळा, हॉटेल, धाबे, दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि शेतांकडे जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अनधिकृत प्रवेशमार्गांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दुभाजक खंडित असल्याने अनेक वाहनचालक थेट महामार्गाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जातात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून दुभाजक दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी आहे.
गांधीगिरी आंदोलन
वारंवार अपघात होऊनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी खंडित दुभाजकांना पुठ्ठे लावून प्रशासनाचे लक्ष वेधले. तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
प्रशासनाचे आश्वासन
या प्रश्नावर पदाधिकाऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी परमेश्वर सुतार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी एक तारखेनंतर खंडित दुभाजक बंद करण्याचे आश्वासन दिले. तसेच शहरातील दुभाजकांवर रिफ्लेक्टर बसविण्याची आणि झेब्रा पट्टे मारण्याची मागणी करण्यात आली. ही कामे लवकरात लवकर करण्याचे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले. खंडित दुभाजक बंद करण्याच्या आश्वासनानंतर प्रत्यक्ष काम कधी सुरू होते, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे. या वेळी संदीप भामरे, तुषार वाघ, दिगंबर सोनवणे, अशोक भामरे, आर. टी. सोनवणे, रणधीर मोरे, दादाजी खैरनार आदी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply