भारतीय संस्कृतीत लक्ष्मी पावलांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक शुभकार्यात लक्ष्मी पावलांचे पूजन केले जाते आणि दिवाळीत तर त्यांना अनन्यसाधारण स्थान आहे. त्यामुळे दिवाळीच्या शुभ पर्वासाठी नाशिकच्या बाजारात विविध प्रकारची लक्ष्मी पावले आणि तोरणे विक्रीसाठी आली आहेत. नागरिकांकडून त्यांच्या खरेदीकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी घराच्या उंबरठ्यावर आणि अंगणात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस रांगोळीच्या माध्यमातून लक्ष्मी पावले साकारली जात असत. मात्र काळाबरोबर या परंपरेलाही आधुनिकतेचा स्पर्श झाला आहे. वेळेच्या अभावामुळे बाजारात आता कागदी, ॲक्रेलिक आणि लाकडी स्वरूपातील लहान-मोठी लक्ष्मी पावले उपलब्ध झाली आहेत. त्याचबरोबर शुभ-लाभ लिहिलेली नावे विविध डिझाईन्समध्ये, तसेच उंबरपट्टी, तोरण, वॉलपीस आणि झुंबर यांसारख्या वस्तूही मोठ्या प्रमाणावर बाजारात आल्या आहेत. या वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू असून जागोजागी दुकाने सजली आहेत. दरम्यान, महागाई आणि कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे यंदा या साहित्याच्या दरांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
तयार रांगोळी स्टिकर्सची वाढती पसंती
धावपळीच्या जीवनात पूर्वीप्रमाणे घराच्या अंगणात प्रत्यक्ष रांगोळी काढणे अनेक महिलांना शक्य होत नाही. शिवाय सध्या बहुतांश ठिकाणी फ्लॅट पद्धत असल्याने घरासमोर अंगण किंवा फ्लॅटसमोर रांगोळी काढण्यासाठी हवी तशी जागा राहत नाही. यावर उपाय म्हणून नागरिक रेडिमेड आणि विविध आकर्षक डिझाईन्समधील रांगोळी स्टिकर्स खरेदी करून फ्लॅट, घरे आणि दुकानांसमोर चिकटविण्यावर भर देत आहेत.
हत्ती, गाय-वासरू, कलश, मोर आणि स्वस्तिक यांसारख्या पारंपरिक व शुभ प्रतीकांच्या विविध डिझाईन्समध्ये ॲक्रेलिक, कागदी आणि लाकडी स्वरूपातील शुभ-लाभचे प्रकार बाजारात उपलब्ध असून ते ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.
यंदाचे दर
बाजारातील दरांनुसार लक्ष्मी पावले २० ते १०० रुपयांना, शुभ-लाभ ५० ते ३०० रुपयांना, उंबरपट्टी २० रुपयांना, रांगोळी स्टिकर २० ते १५० रुपयांना, शुभ-लाभ तोरण ८० ते १०० रुपयांना, विविध प्रकारची तोरणे १५० ते ३०० रुपयांना आणि झुंबर १०० ते ३०० रुपयांना उपलब्ध आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply