परदेशात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या आपल्या माणसांना दिवाळीच्या सणाला घरच्या फराळाची चव चाखता यावी, यासाठी भारतीय टपाल विभागाने एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. या सेवेमुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या नातलगांपर्यंत घरचा फराळ व भेटवस्तू सहज आणि सुरक्षितपणे पोहोचवता येणार आहेत.
टपाल कार्यालयातच पॅकिंगची सोय
फराळाचे पदार्थ लांबच्या प्रवासात नीट राहावेत, यासाठी टपाल कार्यालयातच माफक दरात चांगल्या दर्जाचे पॅकिंग उपलब्ध करून देण्यात आले आहे. अवघ्या काही मिनिटांत पॅकिंग पूर्ण होऊन पार्सल थेट परदेशाकडे रवाना केले जाते. ग्राहकांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून पार्सल उचलण्याची (पिक-अप) सोय तसेच पार्सल कुठे पोहोचले आहे हे ऑनलाइन तपासण्याची ‘ट्रॅक अँड ट्रेस’ सुविधाही देण्यात आली आहे.
पार्सल पाठवताना कोणती कागदपत्रे लागतात?
परदेशात पार्सल पाठवताना केवायसीसाठी ओळखपत्र देणे आवश्यक आहे. त्याशिवाय पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंची वजनासह सविस्तर यादी, वस्तूंचे मूल्य आणि आठ अंकी एचएस कोड देणे बंधनकारक आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे डाक विभागाचे प्रवर अधीक्षक एस. बी. ताठे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी १५ हून अधिक देशांत पार्सल्स
गेल्या वर्षी या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. धुळे, नंदुरबार, शहादा आणि शिरपूर भागातून पॅरिस, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान, जर्मनी, कॅनडा, इंग्लंड, रशिया, कुवेत, युएई आणि सौदी अरेबियासह १५ हून अधिक देशांत ३५ हून अधिक पार्सल्स सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली. खासगी कुरिअरच्या तुलनेत टपाल खात्याची ही सेवा माफक दरात मिळत असल्याने नागरिकांची आर्थिक बचत होते. या सेवेतून नागरिक ३५ किलो वजनापर्यंतचा फराळ आणि भेटवस्तू पाठवू शकतात.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply