यंदा एल निनोमुळे पावसाने दडी मारली आणि मान्सूनच्या पावसात मोठी तूट झाल्याने राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन खरीप हंगामात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. निदान रब्बी हंगामासाठी तरी पाऊस होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती, मात्र तीही फोल ठरली. खरीप तर नाहीच, पण रब्बी हंगामही हातचा गेला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. दरम्यान राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून दुष्काळांतर्गत उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
सुका चारा १२ रुपये, मुरघास ८ रुपये प्रति किलो
जनावरांच्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी सुका चारा व मुरघास खरेदीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. सुका चारा १२ रुपये, तर मुरघास ८ रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. चारा खरेदीबाबत प्रशासनाला काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. आंबट किंवा कुबट वास नसलेला चारा खरेदी करावा, चाऱ्यासाठी ज्वारी व बाजरी खरेदीस प्राधान्य द्यावे आणि बुरशी, माती व कीड न लागलेला चारा खरेदी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक खर्चासाठी स्वतंत्र निधी देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना इतर सवलतीही; कर्जवसुलीला स्थगिती
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने विविध योजनाही राबवण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना मदत म्हणून याच आठवड्यात पाच हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इतरही सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि बँकेच्या कर्जवसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतर आता पशुमालकांना चारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खरेदीचे दर निश्चित झाल्यामुळे पाळीव प्राण्यांच्या चाऱ्याची सोय होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply