दिवाळी सणाच्या काळात येवल्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वर्षभर तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना नगरपालिकेने अचानक पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. धरणे भरलेली असून येवल्याच्या साठवण तलावातही पुरेसे पाणी आहे. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शिवसेनेचे कुणाल दराडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
टंचाई उद्भवू नये म्हणून पालखेड आवर्तनाची मागणी
येवलेकरांना सातत्याने तीन किंवा चार दिवसाआड पाणी मिळत असल्याने नियमित टंचाईचा सामना करावा लागतो. या वर्षी राज्यभरात टंचाईची परिस्थिती गंभीर असल्याचे वास्तव असून शासनानेही पाणी कपातीची सूचना केली आहे. मात्र दिवाळीपूर्वीच पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा अचानक निर्णय का घेतला, असा प्रश्न दराडे यांनी उपस्थित केला आहे.
शहराला पालखेड डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा होतो आणि गंगासागर तलाव तसेच टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावात पाणी दिले जाते. या तलावांतील पाणी सुमारे दोन महिने पुरते. योग्य नियोजन केल्यास दिवाळीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा करून नंतर त्यात बदल करता येईल. त्यामुळे संपूर्ण शहराचा विचार करून दिवाळी होईपर्यंत दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
रब्बीसाठीही एक आवर्तन द्यावे
शहराच्या साठवण तलावासह ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या तलावातील पाणीसाठा आटला आहे. पालखेड कालव्यातून दरवर्षी रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने दिली जातात. यंदा खरीप वाया गेला असून पालखेडच्या आवर्तनाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी लाल कांद्याची लागवड केली आहे. कमी पाऊस आणि उन्हामुळे विहिरींचे पाणी आटू लागले असून शेतात घेतलेले पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे धरणात पाणी असल्याने पालखेड डाव्या कालव्याला रब्बीसाठी एक आवर्तन द्यावे, अशी मागणीही दराडे यांनी केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply