दिवाळी सणासाठी फराळ आणि मिठाई बनवण्यासाठी साखरेला मोठी मागणी असते. या काळात साखरेचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता असते, मात्र यंदा वाशीच्या घाऊक बाजारात साखरेचे भाव स्थिर राहिल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा पुरेसा आणि सुरळीत असल्याने दिवाळीत साखरेच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता नाही, असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
साखरेच्या भावात यापूर्वी झालेल्या मोठ्या चढ-उतारांचा फटका ग्राहकांसह व्यापाऱ्यांनाही बसला होता. साधारणपणे किलोमागे ४० रुपयांच्या आसपास असलेले भाव काही महिन्यांपूर्वी ७० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचल्याने बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. त्यानंतर भावात घसरण होऊन सध्या बाजारातील परिस्थिती तुलनेने स्थिर झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाशीच्या घाऊक बाजारातील साखरेची आवक सुमारे १० टक्क्यांनी वाढली आहे.
घाऊक आणि किरकोळ भाव
सध्या घाऊक बाजारात साखरेचा भाव प्रतिकिलो ४९ ते ५१ रुपये, म्हणजेच प्रतिक्विंटल ५,२५० रुपये आहे. किरकोळ बाजारात साखर प्रतिकिलो ५९ ते ६० रुपयांना मिळत आहे. वाहतूक, पॅकिंग आणि स्थानिक व्यापाऱ्यांचा खर्च यामुळे घाऊक आणि किरकोळ भावात किलोमागे सुमारे ८ ते ११ रुपयांचा फरक दिसून येत आहे.
दिवाळीपर्यंत दरवाढीची शक्यता नाही
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी वाढत असली, तरी बाजारातील आवक आणि पुरवठा लक्षात घेता भाव स्थिर आहेत. दिवाळीपर्यंत साखरेच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता नाही, असे शुगर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी म्हटले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply