येवला तालुक्यातील एरंडगाव शिवारात शेतात वीजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या युवकासमोर अचानक दोन बिबटे आले. डरकाळी फोडत बिबटे समोर येताच मृत्यू समोर उभा ठाकल्याची जाणीव झालेल्या युवकाने क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उतरून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तब्बल दहा मिनिटे विहिरीत जीव मुठीत धरून बसलेल्या या युवकाची कहाणी ऐकून परिसरातील शेतकऱ्यांच्या अंगावर काटा आला.
एरंडगाव येथील वैभव शांताराम घोरपडे हा युवक शेतात विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेला असता त्याला डोळ्यासमोर अचानक दोन बिबटे दिसले. प्रसंगावधान राखत त्याने विहिरीच्या कडेला धरून खाली उतरत विहिरीचा आसरा घेतला.
दहा मिनिटे विहिरीत जीव मुठीत
बिबटे परिसरातच असल्याच्या भीतीने त्याने काही काळ विहिरीतच काढला. दहा मिनिटांनंतर थोडा धीर आल्यावर त्याने मित्रांना दूरध्वनी करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावून आले. माणसांची चाहूल लागताच दोन्ही बिबट्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर वैभवला विहिरीबाहेर काढण्यात आले.
बिबट्यांच्या बंदोबस्ताची मागणी
दोन्ही बिबटे ही छोटी पिल्ले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, त्यांची मादी बिबटही याच परिसरात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे एरंडगाव शिवारातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या परिसरात पाहणी करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Leave a Reply