रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघे जखमी झाले आहेत. महाड एमआयडीसीमधील एका कंपनीत काम करणारे चौघेजण श्रीवर्धन येथे फिरण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात असताना त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली.
नेमका अपघात कसा घडला?
महाड एमआयडीसीमधील बिर्ला ओपस कंपनीत काम करणारे मनन पांचाळ, साईराज भोसळ, अभिषेक देवघरे आणि अर्यन शिंदे हे चौघेजण श्रीवर्धन येथे फिरण्यासाठी गेले होते. श्रीवर्धनहून परत येत असताना म्हसळा बायपासच्या तीव्र उतारावर चालकाचा कारवरील ताबा सुटला. वेगात असलेली कार रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली आणि तिचा चेंदामेंदा झाला.
दोघांचा मृत्यू, दोघे जखमी
हा अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चुराडा झाला. या दुर्घटनेत मनन पांचाळ आणि साईराज भोसळ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अभिषेक देवघरे आणि अर्यन शिंदे हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दोन होतकरू तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Leave a Reply