नवी मुंबईत झपाट्याने आधुनिकीकरण होत असतानाही गावठाणांनी आपली पारंपरिक संस्कृती आणि धार्मिक वारसा जपला आहे. याचाच प्रत्यय शनिवारी, 21 नोव्हेंबर रोजी तुर्भेसह विविध गावठाणांमध्ये पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या तुळशी विवाह सोहळ्यातून आला. मंगलाष्टके, भजन आणि पारंपरिक वरातीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.
कार्तिक शुक्ल द्वादशीला तुळशी विवाह
हिंदू धर्मपरंपरेत तुळशी विवाहाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. कार्तिक शुक्ल द्वादशीला तुळशी विवाहाचा सोहळा मोठ्या थाटात साजरा केला जातो. तुळशी वृंदावनाची आकर्षक सजावट, फुलांची आरास, रांगोळ्या आणि दिव्यांची रोषणाई अशा मंगलमय वातावरणात तुळशी आणि भगवान विष्णूंचे प्रतीक असलेल्या शाळिग्रामाचा विवाह पारंपरिक विधीवत पद्धतीने पार पडला. या विवाहानंतर शुभकार्यांना सुरुवात करण्याची परंपरा आहे. महिलांनी मंगलाष्टके, पारंपरिक विवाहगीते आणि विधींमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.
तुर्भे गावातही आयोजन
शैक्षणिक आणि सांस्कृतिक गाव म्हणून ओळख असलेल्या तुर्भे गावाने आपली पारंपरिक संस्कृती आणि धार्मिक परंपरा आजही जपली आहे. शनिवारी तुर्भे गावातील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या तुळशी विवाह सोहळ्यात भगवान श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान करून विवाह पार पडला. पारंपरिक विवाह सोहळ्याप्रमाणेच करवल्या, बँडबाजा वाजवत नवरदेवाला मंदिरापर्यंत आणले गेले. नवी मुंबईसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात आधुनिक जीवनशैलीचा प्रभाव वाढत असतानाही गावठाणांमध्ये सण-उत्सव नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे तुळशी विवाहासारखे धार्मिक सोहळे केवळ श्रद्धेपुरते मर्यादित न राहता सामाजिक एकोपा, कौटुंबिक जिव्हाळा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे माध्यम ठरत आहेत.
Leave a Reply