अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत सुमारे ४३.५६ टन अन्नसाठा जप्त करण्यात आला असून ७१९.२ लिटर दूध व तूप जप्त/नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईतील मुद्देमालाची एकूण किंमत १.५६ कोटी रुपये आहे. निकृष्ट, भेसळयुक्त व चुकीचे लेबलिंग असलेल्या अन्नपदार्थांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.
मुंबईत गोवंडी, मानखुर्द, अँटॉप हिल, चेंबूर व धारावी परिसरात २३ व २४ ऑक्टोबर रोजी तपासणी मोहीम राबविण्यात आली. गोवंडी येथील साईनाथ डेअरीमधून ४५ लिटर व मानखुर्द येथील महाराणा डेअरीमधून ४० लिटर असे एकूण ८५ लिटर संशयास्पद सुटे दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. ‘शेड्युल ४’ मधील तरतुदींचे उल्लंघन आढळल्याने या दोन्ही आस्थापनांची नोंदणी निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे. मानखुर्द येथील अगस्ती मिल्क एजन्सी येथे स्वच्छता व आरोग्यविषयक मानकांचे उल्लंघन आढळल्याने परवाना निलंबित करण्यात येत आहे. अँटॉप हिल येथील सागर मिल्क सेंटर येथे प्लास्टिकच्या पिशव्या व कॅन्समधून दूध साठवण व विक्री होत असल्याचे आढळल्याने २५० लिटर दूध (किंमत ११,६२५ रुपये) जागेवरच नष्ट करण्यात आले. धारावी येथील शक्ती डेअरीमधून ३१ लिटर व माहीम पश्चिम येथील राहुल मिल्क सेंटरमधून १९८ लिटर कच्चे सुटे गायीचे दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. अशा प्रकारे मुंबईत एकूण ५६४ लिटर दूध नष्ट करण्यात आले.
कोकण विभागात मसाले, धान्य, सुका मेवा, डिंक, कच्च व गोंद कतीरा तसेच कच्चे म्हशीचे दूध अशा अन्नपदार्थांची तपासणी करण्यात आली. या विभागात ९.९९ टन अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ५३.५५ लाख रुपये आहे. यामध्ये बोरिवली पश्चिम येथील मसाला, पनवेल येथील कोथिंबीर बियाणे, महापे एमआयडीसी येथील मनुका, बदाम, खारे पिस्ते, चिया बिया, कच्च व गोंद कतीरा, वाशी एपीएमसी येथील जिरे, मोहरी व कच्चा काजू आणि हिंदुस्तान मसाला मिल येथील अख्खे धणे यांचा समावेश आहे. उरण येथील श्री बालाजी डेअरीकडून ९३ लिटर कच्चे म्हशीचे दूध जप्त करण्यात आले.
पुणे विभागात पुणे-पंढरपूर मार्गावर वाहनातून वाहतूक होत असलेला १,३३७ किलो खवा (किंमत ४,८१,३२० रुपये) आणि तासगाव येथील ५३८ किलो कांदा-लसूण मसाला जप्त करण्यात आला. सोलापूर व नारायणगाव येथून भाजी मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, मालवणी मसाला व मटण मसाला असा एकूण २.११ टन साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ७.९३ लाख रुपये आहे.
नाशिक विभागात २३ ऑक्टोबर रोजी हेल्थ मेक्स एंटरप्रायझेस येथून ४३० किलो भाजी शेव व पिवळी शेव, भगूर येथील पंकज ऑइल मिलमधून ३,२१० किलो रिफाइंड सोयाबीन तेल, येवला येथील दीपक एजन्सीमधून ६२.२ लिटर देशी गायीचे तूप आणि पंचवटी येथील पुष्पा ट्रेडिंगमधून ३६७ किलो मिठाई मिक्स नारळ पावडर व डेसिकेटेड कोकोनट पावडर जप्त करण्यात आली. या विभागातील जप्तीची एकूण किंमत ८.२५ लाख रुपये आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात २६.८४ टन अन्नपदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ६४ लाख रुपये आहे. यामध्ये वसमत येथील २३,७०० किलो हळद पावडर (किंमत ५९.५० लाख रुपये), धर्माबाद येथील मिरची पावडर व मीठ आणि उदगीर येथील मिरची पावडर यांचा समावेश आहे. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यातील मुसा ऑइल इंडस्ट्रीज येथून पुनर्वापर केलेल्या डब्यांमध्ये साठवलेले ८८३.३ किलो तेल जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १.७७ लाख रुपये आहे.
प्रतिबंधित अन्नपदार्थांविरुद्धच्या कारवाईत ग्रेटर मुंबईत ४,२२,८८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुण्यात १९,५६,२६१ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून ५ आस्थापनांवर एफआयआर, ७ जणांना अटक, ५ आस्थापने सील आणि २ वाहने (किंमत ११ लाख रुपये) जप्त करण्यात आली आहेत. नाशिक विभागात १९,०९० रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून १ एफआयआर व १ अटक करण्यात आली आहे.
तपासणीत अस्वच्छ किचन व ड्रेनेज, शाकाहारी-मांसाहारी अन्नाचे एकत्र साठवण, अनधिकृत खाद्यरंगांचा वापर आणि कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे यांसारखे गंभीर उल्लंघन आढळल्याने मुंबईतील ७ आस्थापनांचे परवाने/नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. यामध्ये अंधेरी पश्चिम येथील ऑटोमन कॅफे व भारत कॅन्टीन, लोअर परळ येथील मुंबई दरबार फॅमिली रेस्टॉरंट आणि सेवरी पश्चिम येथील पी. बी. एंटरप्रायसेस यांच्यासह जोगेश्वरी पश्चिम, ओशिवरा व भायखळा येथील आस्थापनांचा समावेश आहे.
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत अथवा गैरप्रकाराबाबत तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ तसेच Food & Drug Grievance Portal वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Leave a Reply