महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील त्रिस्तरीय प्रक्रिया केलेल्या पाण्याचा औष्णिक विद्युत प्रकल्पांसाठी पुनर्वापर करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड या कंपनीने प्राथमिक स्वरूपात सकारात्मक प्रतिसाद देत होकार दर्शवला आहे. महाजेनको आणि केंद्र सरकारच्या एनटीपीसी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या या कंपनीने महापालिकेला पत्राद्वारे होकार कळवला आहे.
५० किलोमीटर परिघातील प्रकल्पांना पाणीपुरवठा
महापालिका हद्दीपासून ५० किलोमीटर परिघातील सर्व औष्णिक विद्युत प्रकल्पांना महापालिकेच्या प्रक्रिया केंद्रातील पाणी पुरवण्याची योजना आहे. शाश्वत जल व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे ताज्या पाण्याच्या स्रोतांवरील अवलंबित्व कमी होईल आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा लाभदायक पुनर्वापर होईल. महापालिकेची सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आणि सिन्नर येथील औष्णिक विद्युत प्रकल्प यांचे भौगोलिक अंतर जवळचे असल्याने हा प्रस्ताव व्यवहार्य ठरू शकतो.
तांत्रिक आणि व्यापारी व्यवहार्यता तपासली जाणार
केंद्र व राज्य शासनाच्या जल पुनर्वापर धोरणाच्या चौकटीत राहून दोन्ही बाजूंच्या तज्ज्ञांची समिती नेमून तांत्रिक आणि व्यापारी व्यवहार्यता तपासली जाणार आहे. दरम्यान, कंपनीने पाणी खरेदी किंवा कोणताही दीर्घकालीन करार करण्याची बांधिलकी घेतलेली नाही. अटी व शर्ती पूर्ण झाल्यानंतर करार अंतिम केला जाणार आहे.
कंपनीने महापालिकेकडे यासंदर्भात माहिती मागवली होती. त्यात प्रत्येक केंद्रनिहाय रोज किती पाणी उपलब्ध होईल, हंगामी चढ-उतार, भविष्यातील वाढीचे नियोजन, पाण्याचे अलीकडील प्रयोगशाळा अहवाल, हमी पॅरामीटर्स, सतत गुणवत्ता तपासणीची यंत्रणा, पाणी घेण्याचे केंद्र, वितरणाचे ठिकाण, जलवाहिनीचा मार्ग, पंपिंग यंत्रणा, साठवणूक तलाव, मोजमाप यंत्रणा, अखंड पुरवठ्याची हमी, पर्यायी व्यवस्था, नियोजित देखभाल दुरुस्तीसाठी बंदचा कालावधी, सेवा खंडित झाल्यास जबाबदारी, प्रकल्पाचा अंदाजित भांडवली व परिचालन खर्च आणि खर्चाचे वाटप यांचा समावेश होता.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply