सोलापूर शहर-जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भारतीय डाक विभागाने ‘वन डे डाकिया’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शाळा व महाविद्यालयांतील १६ वर्षांवरील विद्यार्थ्यांना एका दिवसासाठी पोस्टमनसोबत टपाल वितरण फेरीत सहभागी होता येणार आहे.
सहभागी विद्यार्थ्यांना पोस्टमनचा गणवेश, स्वयंसेवी सेवेचे प्रमाणपत्र आणि टपाल व पार्सल बुकिंग तसेच टपाल तिकिटे व स्टेशनरी खरेदीसाठी ५०० रुपयांचे पोस्टल कूपन दिले जाणार आहे. हे कूपन एक वर्ष वैध असेल. या उपक्रमाची सुरुवात नव्या वर्षापासून (१ जानेवारी २०२७) होणार असून दर दोन महिन्यांनी याचे आयोजन केले जाईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयांमार्फत संबंधित पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून ७ डिसेंबरपूर्वी नोंदणी करावी.
उपक्रमातून काय शिकायला मिळणार?
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना डाक विभागाचा इतिहास, विविध टपाल सेवा, टपाल वितरण प्रक्रिया व पोस्टमनवर असलेली जबाबदाऱ्यांची माहिती मिळणार आहे. प्रत्येक वितरण बीटसाठी एका विद्यार्थ्याची निवड केली जाईल. संपर्कासाठी श्रीरंग श्रीहरी रेगोटी, जनसंपर्क निरीक्षक (डाक) – ९९२१३२४८२३ यांच्याशी संपर्क साधता येईल.
प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण
विद्यार्थ्यांना डाक विभागाचे काम केवळ पुस्तकी ज्ञानातून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पोस्टमनच्या दैनंदिन कामकाजाची ओळख होण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि समाजसेवेची भावना विकसित होईल, असे वरिष्ठ अवर डाक अधीक्षक हेमंत खडकेकर यांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा