शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी जमिनींचे सीमांकन करण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथे रविवारपासून ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार होते. मात्र महामार्गाला शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिवसभर एकही अधिकारी, सर्वेक्षण कर्मचारी अथवा पोलिस तेथे फिरकलेच नाहीत. त्यामुळे नियोजित ड्रोन सर्वेक्षण झाले नाही.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या मोनार्क सर्व्हेअर कंपनीकडून इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांच्या २३ नोव्हेंबर रोजीच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात रविवारी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार होते.
शेतकऱ्यांचा दिवसभर ठिय्या
या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी वारणा परिसरातील शेतकरी आधीपासूनच सज्ज होते. प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होऊ नयेत, यासाठी शेतकऱ्यांनी गाफील न राहता परिसरातील विविध ठिकाणी गनिमी काव्याने ठिय्या मांडला होता. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेतकरी सर्वेक्षणाच्या संभाव्य हालचालींवर लक्ष ठेवून होते.
यावेळी नितीन हुजरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपत पवार, शेतकरी-शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे, प्रकाश मोरे, संभाजी चरणे, बबन हुजरे, प्रताप पाटील, सुनील सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा