नवीन प्रजातींना प्रसिद्ध व्यक्तींची नावे देण्याची प्रथा असताना घानातील एका संवर्धन जीवशास्त्रज्ञाने जगातील सर्वात लहान आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या बेडकाला आपल्या कष्टकरी आईचे नाव दिले आहे. ‘अफिया बिरागो पडल फ्रॉग’ असे या दुर्मीळ बेडकाचे नाव असून, त्याचे सूक्ष्म रूप आणि अस्तित्वाचा संघर्ष सध्या जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा तपकिरी रंगाचा बेडूक जगातील सर्वात सूक्ष्म उभयचर प्राण्यांपैकी एक आहे. पूर्ण वाढ झाल्यावर त्याची लांबी अवघी दोन सेंटीमीटर, तर वजन १.७५ ग्रॅमपेक्षाही कमी असते. जन्माला येणारे पिल्लू एखाद्या स्वल्पविरामाएवढे लहान असते, तर लहान बेडकाचा आकार पेन्सिलच्या टोकापेक्षाही लहान म्हणजेच फक्त पाच मिलिमीटर इतका असतो. हा बेडूक ‘स्प्रिंगटेल्स’ नावाचे अत्यंत सूक्ष्म सहा पायांचे कीटक खाऊन जगतो.
केवळ दोन डबक्यांत शिल्लक
संपूर्ण पृथ्वीवर हा बेडूक केवळ दक्षिण-पूर्व घानातील ‘अटेवा रेंज फॉरेस्ट रिझर्व्ह’मधील दोनच बारमाही डबक्यांमध्ये शिल्लक राहिला आहे. यापूर्वी काकुम राष्ट्रीय उद्यानाजवळ तो आढळला होता; मात्र तिथे कोकोची शेती झाल्याने त्याचा अधिवास पूर्णपणे नष्ट झाला. अटेवा जंगलातही ‘गॅलम्सी’ म्हणजेच बेकायदेशीर सोने उत्खननामुळे पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले आणि हा बेडूक नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला.
आईच्या संघर्षातून प्रेरणा
प्रजाती वाचवण्यासाठी २० बेडूक लंडनच्या प्राणिसंग्रहालयात नेण्यात आले. तिथे क्युरेटर बेन टॅपले यांनी आर्द्रता वाढवून कृत्रिम पावसाचे वातावरण तयार केले; त्यातून १५ पिल्लांचा जन्म झाला. वडिलांच्या निधनानंतर डोक्यावर जुन्या कपड्यांचे ओझे वाहून आठ मुलांना शिकवणाऱ्या आपल्या आईच्या संघर्षातून प्रेरणा घेत ओफोरी-बोटेंग यांनी या सूक्ष्म जीवाला मृत्यूच्या दाढेतून परत आणले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा