जगातील सर्वात गरीब आणि अत्यंत बंदिस्त देशांपैकी एक असलेल्या उत्तर कोरियातील सामान्य नागरिकांना बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्याची मुभा नाही. मोजक्याच श्रीमंत लोकांकडे दूरध्वनी किंवा संगणक असले तरी त्यांचा वापर केवळ सेन्सॉर केलेल्या अंतर्गत जाळ्यापुरता मर्यादित असतो. परदेशी चित्रपट पाहणे तेथे गुन्हा मानला जातो. तरीही याच देशाने जगातील सर्वात ताकदवान हॅकिंग दल उभे केले आहे, हे अनेकांना आश्चर्य वाटावे असे आहे.
गेल्या महिन्यात जगातील सर्वात मोठ्या बायनान्स या क्रिप्टो विनिमय केंद्रातून तब्बल सहा अब्ज डॉलर्सची, म्हणजे सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांची, क्रिप्टोकरन्सी चोरण्यात आली. या चोरीमुळे उत्तर कोरियाने आतापर्यंत लुटलेली एकूण रक्कम तेरा अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या सायबर दलाची पायाभरणी १९८० च्या दशकात तत्कालीन शासक किम इल सुंग यांनी केली होती.
हॅकर्सची भरती कशी होते?
राजधानी प्योंगयांगमध्ये हुशार विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि परदेशी भाषा शिकवणाऱ्या खास शाळा सुरू करण्यात आल्या. दरवर्षी संगणकशास्त्रातील अव्वल शंभर विद्यार्थ्यांना लष्करी विद्यापीठांमध्ये पाठवले जाते. त्यातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना पुढील प्रशिक्षणासाठी चीन, रशिया आणि काही पाश्चात्त्य देशांमध्येही पाठवले गेले. मायदेशी परतल्यावर या तरुणांची भरती लष्कराच्या कुप्रसिद्ध युनिट १२१ मध्ये केली जाते. गरिबीत खितपत पडलेल्या या देशात हॅकर्सना राजधानीत आलिशान घरे आणि विशेष सवलती दिल्या जातात. आज किम जोंग उन यांच्या या सायबर दलात एक हजार आठशे ते सात हजार प्रशिक्षित हॅकर्स कार्यरत असल्याचे मानले जाते.
या दलाने २०१४ मध्ये हॉलीवूडच्या सोनी पिक्चर्सवर सायबर हल्ला करून आपल्या ताकदीची चुणूक दाखवली होती. त्यानंतर २०१६ मध्ये बांगलादेशच्या मध्यवर्ती बँकेतून एक्याऐंशी दशलक्ष डॉलर्स लंपास करण्यात आले. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे आर्थिक कोंडी झाल्यावर उत्तर कोरियाने क्रिप्टोकरन्सीकडे मोर्चा वळवला. २०२५ मध्ये बायबिट या मंचावरून दीड अब्ज डॉलर्स चोरल्यानंतर नुकतीच बायनान्सवर इतिहासातील सर्वात मोठी सायबर दरोडेखोरी करण्यात आली.
चोरलेला पैसा कुठे जातो?
या हॅकर्सचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे सोशल इंजिनिअरिंग, अर्थात मानवी चुकांचा फायदा घेणे. बनावट नोकरीच्या मुलाखती, फिशिंग ईमेल आणि डीपफेक व्हिडीओ कॉल्सच्या माध्यमातून ते कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना जाळ्यात ओढतात. बायनान्सच्या एका कर्मचाऱ्याला बनावट मुलाखतीत फसवून अवघ्या वीस मिनिटांत सहा अब्ज डॉलर्स लुटले गेले. चोरलेली क्रिप्टोकरन्सी विविध ब्लॉकचेन आणि मिक्सर्समधून फिरवून तिचा मागोवा पुसला जातो. त्यानंतर ती चिनी दलालांना विकून त्याबदल्यात रोख रक्कम किंवा चिनी बँक खात्यात पैसे घेतले जातात. या प्रक्रियेत मूळ रकमेच्या पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्के हिस्सा उत्तर कोरियाच्या हाती लागतो.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, उत्तर कोरियाच्या एकूण परकीय चलनापैकी निम्मा वाटा या सायबर चोऱ्यांमधून येतो. या पैशांचा वापर आंतरराष्ट्रीय निर्बंधांना न जुमानता अण्वस्त्रे, क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि रशियाला शस्त्रास्त्र पुरवठा करण्यासाठी केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने हे हल्ले अधिकच घातक होत असून, जागतिक सायबर सुरक्षेसमोर हे सर्वात मोठे आव्हान बनले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा