प्रत्येक महिन्याची पहिली तारीख अनेक नवीन बदल घेऊन येते आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. आता १ डिसेंबर २०२६ पासून एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक नवीन नियम लागू होणार आहे. पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी किंवा वाहतुकीचा खर्च देण्यासाठी एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागू शकतात.
एसबीआय कार्डने आपल्या नियमांमध्ये सुधारणा केली असून काही विशिष्ट इंधन आणि वाहतूक खर्चांवर १ टक्का अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. मात्र हे शुल्क प्रत्येक खरेदीवर लागू होणार नाही. खर्च एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाल्यासच हे शुल्क लागू होईल, त्यामुळे नवीन नियम लागू होण्यापूर्वी प्रत्येक पेमेंटसाठी लागू होणारे शुल्क समजून घेणे महत्त्वाचे आहे.
इंधन खर्चावर कधी लागणार शुल्क?
नवीन नियमांनुसार, एका बिलिंग सायकलमध्ये एकूण पात्र इंधन खर्च ५०,००० रुपयांपेक्षा जास्त झाला, तर संपूर्ण खर्चावर १ टक्का शुल्क आकारले जाईल. उदाहरणार्थ, एकाच बिलिंग सायकलमध्ये पात्र इंधनावर ६०,००० रुपये खर्च केले, तर १ टक्का दराने अतिरिक्त ६०० रुपये भरावे लागतील. त्याचप्रमाणे ७५,००० रुपयांच्या इंधन खर्चावर ७५० रुपये शुल्क आकारले जाईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकदा ५०,००० रुपयांची मर्यादा ओलांडली की हे शुल्क केवळ अतिरिक्त रकमेवर नव्हे, तर संपूर्ण पात्र इंधन खर्चावर लागू होईल. खर्च ५०,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यास हे नवीन शुल्क लागू होणार नाही. या उद्देशासाठी एसबीआय कार्डने एमसीसी ५१७२, ५५४१, ५५४२ आणि ५९८३ यांचा पात्र इंधन श्रेणीमध्ये समावेश केला आहे.
वाहतूक खर्चाचे नियम काय?
वाहतुकीसाठी ३०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या प्रत्येक पात्र व्यवहारावर १ टक्का शुल्क आकारले जाईल. उदाहरणार्थ, ४०,००० रुपयांचे एकरकमी पेमेंट केले, तर अतिरिक्त ४०० रुपये लागतील. मात्र ३०,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या पेमेंटसाठी हे शुल्क लागू होणार नाही. या उद्देशासाठी एमसीसी कोड ४१११, ४७८४ आणि ४१३१ निश्चित करण्यात आले आहेत. या शुल्कावर लागू करही लागू होऊ शकतात.
दोन नियमांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. इंधन खर्चाची मर्यादा बिलिंग सायकलच्या एकूण खर्चानुसार ठरवली जाईल, तर वाहतूक मर्यादा प्रत्येक व्यवहारावर लागू होईल. याशिवाय नवीन इंधन शुल्क हे सध्याच्या इंधन अधिभारापेक्षा वेगळे असेल. कार्डवर उपलब्ध असलेल्या इंधन अधिभार माफीच्या अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच राहतील. त्यामुळे इंधन किंवा वाहतुकीसाठी एसबीआय क्रेडिट कार्डने वारंवार पैसे देणाऱ्यांनी हे नवीन नियम नीट समजून घेणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा