डोंबिवलीत झालेल्या एका भव्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेच्या नव्या क्रीडा संघटनेचे आणि त्याच्या चिन्हाचे अनावरण झाले. या संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रहार पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुनावणी अद्याप सुरू असतानाच ही घोषणा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
चंद्रहार पाटील हे एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील नेते होते. त्यांच्याकडे नव्या क्रीडा संघटनेचे नेतृत्व सोपवण्यात आल्याने या घोषणेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या या नव्या संघटनेमार्फत राज्यभरातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
क्रीडासंग्रामच्या सांगता सोहळ्यात घोषणा
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रीडासंग्रामच्या दुसऱ्या हंगामाचा सांगता सोहळा डोंबिवलीत पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्यासह आमदार रवी फाटक, राजेश मोरे आणि बालाजी किणीकर उपस्थित होते. यावेळी विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या स्पर्धेत ३२ विविध खेळांचा समावेश होता. ३५ हून अधिक क्रीडास्थळांवर झालेल्या या स्पर्धेत तब्बल ७५ हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. खो-खो, रस्सीखेच, लंगडी यांसारख्या पारंपरिक मैदानी खेळांसह नव्या खेळांचाही या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमात उपस्थित असलेले अभिनेते बोमन ईरानी यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. पालकांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून मैदानात पाठवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पुढील हंगामात एक लाख खेळाडूंचे लक्ष्य
मुलांमध्ये प्रतिभा असते, त्यांना फक्त व्यासपीठ आणि संधीची गरज असते, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मोबाईलमुळे मैदानी खेळ विसरले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. क्रीडासंग्राममध्ये मुलांची प्रतिभा पाहायला मिळाली असून खेळाडू आणि पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहता हा उपक्रम यशस्वी झाला, असेही ते म्हणाले.
पुढच्या हंगामात सहभागी खेळाडूंची संख्या एक लाखाचा आकडा पार करेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. लोकप्रतिनिधींनी विकासाबरोबरच खेळांसाठीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. देश आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना खेळातही देशाचे नाव अग्रस्थानी यावे, यासाठी पंतप्रधानांचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा