बांगलादेशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. शरियतपूर जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांमध्ये आणि पदच्युत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या समर्थकांमध्ये रविवारी हिंसक संघर्ष झाला. या चकमकीत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे देशातील राजकीय अस्थिरता आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संघर्षानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
पद्मा पुलाजवळ दोन्ही गट आमनेसामने
पद्मा पुलाजवळील परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले. संघर्षादरम्यान दगडफेक, गोळीबार आणि स्फोटकांचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे. शेख हसीना यांच्या समर्थकांकडून आंदोलनादरम्यान वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
चकमकीत जखमी झालेल्या अनेक नागरिकांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
वादाचं मूळ काय?
शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या राजकीय हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांकडून पक्षावरील बंदी उठवण्याची आणि राजकीय कारवाई थांबवण्याची मागणी केली जात आहे.
शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये भारतातून बांगलादेशात परतण्याचा निर्धार व्यक्त केल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यांच्या मायदेशी परतण्याच्या घोषणेमुळे देशातील राजकीय वातावरण आणखी संवेदनशील बनलं आहे.
या घटनेनंतर पुढील काळात बांगलादेशातील राजकीय परिस्थिती कशी हाताळली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा