म्यानमारमध्ये लष्कराकडून सुरू असलेल्या हवाई आणि तोफगोळ्यांच्या हल्ल्यांनी भीषण रूप धारण केले आहे. रखाइन आणि काया या दोन राज्यांमध्ये शनिवारी झालेल्या वेगवेगळ्या हल्ल्यांत ४९ जणांचा मृत्यू झाला असून ९० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुले आणि वृद्धांचाही समावेश असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रखाइन आणि काया राज्यांतील हल्ले
पश्चिम म्यानमारमधील रखाइन राज्यातील म्राउक-यू शहराला लष्करी विमानांनी लक्ष्य केले. शनिवारी दुपारी आणि रात्रीच्या सुमारास दोन वेगवेगळे हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांत सुमारे २८ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक मदतकार्यकर्त्यांनी दिली. मृत झालेल्या व्यक्तींमध्ये लहान मुले, स्त्रिया आणि वृद्धांचा समावेश आहे. बॉम्बहल्ल्यांमुळे निवासी भागातील इमारतींचे मोठे नुकसान झाले असून बचावकार्य सुरू आहे. पूर्व म्यानमारमधील काया राज्यातील मोबाये परिसरातही लष्कराने हवाई हल्ला केला. एका विवाह सोहळ्याच्या तयारीसाठी नागरिक आणि विस्थापित लोक एकत्र जमले असताना हा हल्ला झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. या हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बालवाडी आणि पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
गृहयुद्धात सामान्य नागरिक भरडले
म्यानमारमध्ये २०२१ मध्ये लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर देशात गृहयुद्ध सुरू झाले. लोकशाही समर्थक संघटना आणि विविध वांशिक सशस्त्र गटांचा लष्करी राजवटीविरोधातील संघर्ष अद्याप सुरू आहे. या संघर्षात हवाई हल्ल्यांचा वापर वाढल्याने सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. काया राज्यातील अंतरिम प्रशासनाने या हल्ल्यांचा निषेध केला असून संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा