डिलिमिटेशन विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) अद्याप अंतिम भूमिका घेतलेली नाही. पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना या विधेयकाबाबत पत्र लिहिलं आहे. त्यावर पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली असून, उद्या सकाळी पक्षाची बैठक होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोल्हे म्हणाले की, रोहित पवार यांनी लिहिलेलं पत्र आपण वाचलेलं नाही. पक्षाने याबाबत आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. उद्या सकाळी पक्षाचे नेते एकत्र बसतील. त्यावेळी विधेयकाचा मसुदा समोर येईल आणि त्यावर आक्षेप का आहेत, यावर चर्चा होईल. चर्चेनंतरच निर्णय घेतला जाईल, असं कोल्हे यांनी स्पष्ट केलं.
रोहित पवारांच्या भावना विचारात घेतल्या जातील
रोहित पवार यांनी आपल्या भावना पत्रातून व्यक्त केल्या असतील, असं कोल्हे म्हणाले. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची मुभा असते. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना पक्ष विचारात घेईल, असंही ते म्हणाले. मात्र रोहित पवार यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, हे आपल्याला माहिती नाही, असं कोल्हे यांनी सांगितलं.
सगळ्यांनीच विधेयकाचा सखोल अभ्यास केलेला नसतो, ही वस्तुस्थिती आहे, असं कोल्हे म्हणाले. त्यामुळे एखाद्या विषयावर केवळ चर्चेतलं मत मांडण्यापेक्षा विधेयकात नेमकं काय आहे, यावर चर्चा करणं गरजेचं आहे. शरद पवार यांच्यावर होणारी टीका पाहून वाईट वाटणं स्वाभाविक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचं योगदान फार मोठं आहे, असंही ते म्हणाले.
टीकाकारांना विधेयकानंतर उत्तर
डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यानंतर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं जाईल, असं कोल्हे यांनी सांगितलं. रोहित पवार हे आपले नेते असून ते आमदार आहेत, असंही ते म्हणाले. उद्याच्या बैठकीला रोहित पवार उपस्थित राहणार की नाही, याची आपल्याला कल्पना नाही, असं कोल्हे यांनी स्पष्ट केलं.
लोकसभेत विधेयक येतं तेव्हा केवळ ऐकीव माहितीच्या आधारे नव्हे, तर विधेयकातील तरतुदींचा अभ्यास होणं गरजेचं असतं, असं कोल्हे म्हणाले. या आक्षेपात तथ्य आहे, असं वाटत नाही. रोहित पवार यांचं पत्र त्यांच्या स्वीय सहाय्यकाने किंवा अन्य कुणीतरी लिहून दिलं असेल, असंही ते म्हणाले. संविधान बदलाचा आक्षेप विधेयकाच्या मसुद्यात दिसत नाही, असं कोल्हे यांनी नमूद केलं. रोहित पवार यांच्या पत्राचा विचार केला जाईल, असंही ते म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा