बीड जिल्ह्यातील परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचे हे देवस्थान असून येथील भव्य आणि पुरातन मंदिरात वर्षभरात नऊ मोठे उत्सव साजरे होतात. देश-विदेशातून भाविक नियमितपणे येथे दर्शनासाठी येतात.
श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या वास्तव्याने आणि ब्रह्मदेव तसेच प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली परळी ही शिव, देव आणि तीर्थभूमी म्हणून ओळखली जाते. येथे महाशिवरात्री यात्रा आणि श्रावणमास या पर्वकाळात दोन मोठे उत्सव होतात. अधिक मासातही येथे भाविकांची मोठी गर्दी असते. काशीपेक्षा येथे एक जवभर पुण्य अधिक असल्याचे मानले जात असल्याने परळीला जवा किंवा जगावेगळी काशी असेही संबोधले जाते.
पौराणिक कथा आणि महत्त्व
आख्यायिकेनुसार पुराणकाळी समुद्र मंथनाच्या वेळी धन्वंतरी वैद्यराज आणि अमृत ही रत्ने निघाली. अमृत पिण्यासाठी राक्षस धावले तेव्हा भगवान श्री विष्णूंनी अमृतासह धन्वंतरीला शंकराच्या पिंडीत गुप्त केले. त्यामुळे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला अमृतेश्वर किंवा वैद्यनाथ हे नाव मिळाले. इंद्रदेवाच्या दरबारातील रत्न म्हणून प्रभू वैद्यनाथाची ओळख होती, अशी कथा आहे. भगवान श्री विष्णूंनी देवांना अमृताचा विजय मिळवून दिल्यामुळे परळीला वैजयंतीक्षेत्र म्हणून ओळखले जात असे.
पुराणकाळी मोठ्या तपश्चर्येनंतर जन्मलेल्या आणि अल्पायुषी असलेल्या मार्कंडेयाने आपल्या आई-वडिलांना होणारे दुःख नाहीसे करण्यासाठी परळीक्षेत्री शिवोपासना केली. या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या भगवान शिवशंकराच्या वरप्रसादाने मार्कंडेयाचा मृत्यू टळला आणि त्याला सोळा कल्पाचे आयुष्य मिळाले. त्यामुळे यमधर्माला विन्मुख होऊन परत जावे लागले. मार्कंडेयाने देवाचे ऋण व्यक्त करण्यासाठी दोन्ही हातांनी शिवपिंडीला कवटाळले. तेव्हापासून दोन्ही हात कवटाळून प्रभू वैद्यनाथाच्या पिंडीचे दर्शन घेण्याची प्रथा येथे पडली. पुराणातील बिल्वियबाळ आणि सतीसावित्रीची कथाही परळीक्षेत्री घडल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात आहे.
श्री वैद्यनाथ मंदिर यादवकालीन आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शालिवाहन शके १७०६ ला या मंदिराचा जीर्णोद्धार केला. याची नोंद मंदिराच्या लाकडी सभामंडपातील तीन नंदींसमोरच्या मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर शिलालेखात आहे.
मंदिराची रचना आणि नऊ मोठे उत्सव
श्री वैद्यनाथ मंदिराचे बांधकाम हेमाडपंती असून ते घडीव, चिरेबंदी आणि भव्य आहे. मंदिर उंचावर असून त्याला भव्य, उंच, दगडी शिखर आहे. मंदिराला पाच प्रवेशद्वार असून पूर्वेकडील महाद्वार भव्य आणि चिरेबंदी आहे. या महाद्वाराच्या आत विस्तीर्ण, उंच आणि प्रशस्त सागवानी लाकडाचा सभामंडप आहे. या सभामंडपात चबुतऱ्यावर चार दगडी कोरीव खांबांवर मंडप असून मंडपात नंदीच्या तीन मूर्ती आहेत. त्यापुढे श्री गणेशाची मूर्ती आहे. मुख्य गाभाऱ्यात श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगाची काळ्या पाषाण शिळेची सतेज, भव्य आणि प्रसन्न स्वयंभू शालिग्राम शिवपिंड आहे.
मंदिर परिसरात श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगासह बारा ज्योतिर्लिंगांची मंदिरे आहेत. मंदिराच्या दक्षिण घाटावर उंच शिखर असलेले श्री ब्रह्मेश्वर शिवमंदिर आहे. पूर्वेकडील महाद्वारासमोर श्री नृसिंह, श्री रुद्राणीदेवी आणि श्रीधरस्वामी यांची छोटी मंदिरे आहेत. नंदीच्या सभामंडपात श्री वीरभद्राची पितळी धातूची भव्य मूर्ती असून श्री गायत्रीदेवीचीही मूर्ती येथे आहे. श्री वैद्यनाथ मंदिरात श्री नारायण, श्री हरिहर, अमृतकुपी आणि मार्कंडेय तीर्थ आहे.
चैत्रशुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा), श्रावणमास उत्सव, कोजागिरी पौर्णिमा, दसरा उत्सव, दीपोत्सव, दिवाळी पाडवा, वैकुंठ चतुर्दशी, मकरसंक्रांत आणि महाशिवरात्र उत्सव हे श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरातील महत्त्वाचे धार्मिक सण आणि उत्सव आहेत. गुढीपाडव्याला श्रींची अलंकार पूजा होते आणि मंदिर शिखरावरील निशाण याच दिवशी विधिवत पूजा करून बदलतात. श्रावणामध्ये मंदिर भाविकांनी गजबजलेले असते आणि श्रावण सोमवारी गर्दी अधिक असते. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात पाच दिवस धार्मिक उत्सव असतो. सायंकाळी महापूजा होते, दुसऱ्या दिवशी भजन, पूजन आणि प्रसाद तर तिसऱ्या दिवशी श्री वैद्यनाथाची पालखी मिरवणूक निघते.
मंदिरात पहाटे पाचला पुजारी श्री वैद्यनाथाची महापूजा करतात. त्यानंतर भाविकांसाठी अभिषेक आणि दर्शनास सुरुवात होते. दुपारी दोन ते तीनदरम्यान पुजारी भस्मपूजा करतात. रात्री दहाला पूजा आणि शेजारती होते. दर सोमवारी रात्री मुख्य मंडपात देवाचा छबिना असतो. परगावच्या भाविकांसाठी श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे १९८१ पासून श्री सदाशिव सेवा नित्य अन्नछत्र चालवले जाते. परळीत येण्यासाठी मुंबई, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, अमरावती, नांदेड, पंढरपूर आणि हैदराबाद येथून थेट रेल्वेसेवा उपलब्ध आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरांपासून थेट बससेवाही उपलब्ध आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा