हिवाळ्यात गरमागरम सूप पिण्याची मजा वेगळीच असते. थंडीच्या दिवसांत संध्याकाळी हलकी भूक लागल्यावर किंवा हलकेफुलके काहीतरी खाण्याची इच्छा झाल्यावर सूप हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सूपमुळे शरीराला उब मिळते आणि भाज्यांचा आहारात सहज समावेश होतो. मात्र रोज एकाच प्रकारचे सूप पिऊन कंटाळा आला असेल, तर यंदाच्या हिवाळ्यात काही वेगळ्या रेसिपी नक्की करून पाहा. टोमॅटो-लसूण, स्वीट कॉर्न, पालक-लसूण, गाजर-अद्रक आणि मिक्स व्हेज अशी पाच प्रकारची सूप तुम्हाला नक्की आवडतील.
टोमॅटो-लसूण आणि स्वीट कॉर्न सूप
टोमॅटो सूप अनेकांना आवडते. त्यात लसणाची भर घातल्यास त्याची चव आणखी खुलते. हे सूप तयार करण्यासाठी टोमॅटो स्वच्छ धुऊन त्यांचे मोठे तुकडे करावेत. कढईत बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि लसूण हलका परतून घ्यावा. कांदा मऊ झाल्यावर त्यात टोमॅटोचे तुकडे घालावेत. दोन ते तीन मिनिटे परतल्यानंतर थोडे पाणी घालून कढई झाकून ठेवावी आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवावेत. नंतर गॅस बंद करून मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे. हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. टोमॅटोच्या बिया आणि साल नको असल्यास मिश्रण गाळून घेता येते. त्यानंतर पुन्हा कढईत काढून आवश्यकतेनुसार पाणी घालावे. त्यात मीठ आणि काळी मिरी पूड टाकून तीन ते चार मिनिटे उकळावे. अशा प्रकारे गरमागरम टोमॅटो-लसूण सूप तयार होईल.
स्वीट कॉर्न सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडते. किंचित गोडसर चव आणि घट्टसर पोत असलेले हे सूप सकाळी किंवा संध्याकाळी कधीही घेता येते. हे सूप तयार करण्यासाठी सर्वप्रथम स्वीट कॉर्न पाण्यात उकळून घ्यावे. त्यातील अर्धे दाणे थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. उरलेले दाणे तसेच बाजूला ठेवावेत. पॅनमध्ये थोडे बटर गरम करून त्यात किसलेले आले घालून परतावे. त्यानंतर गाजर, फरसबी आणि उरलेले अख्खे कॉर्न घालून दोन ते तीन मिनिटे शिजवावे. भाज्या किंचित मऊ झाल्यानंतर त्यात वाटलेले कॉर्न आणि सुमारे दोन कप पाणी घालावे. एका वाटीत कॉर्नफ्लोअर घेऊन त्यात थोडे पाणी मिसळून गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे पातळ मिश्रण तयार करावे. हे मिश्रण सूपमध्ये घालून काही वेळ शिजवावे. शेवटी मीठ आणि काळी मिरी पूड घालून व्यवस्थित मिसळावे. सूप घट्टसर झाल्यानंतर गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कांदापात घालून गरमागरम सर्व्ह करावे.
पालक-लसूण सूप आणि इतर पर्याय
हिवाळ्यात पालक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. पालकाची भाजी किंवा पराठे खाऊन कंटाळा आला असेल, तर त्यापासून चविष्ट सूप तयार करता येते. लसणामुळे या सूपची चव अधिक छान लागते. हे सूप तयार करण्यासाठी सर्वप्रथम पालकाची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावीत. पॅनमध्ये बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि लसूण हलके परतावे. कांदा मऊ झाल्यानंतर त्यात पालकाची पाने घालून दोन ते तीन मिनिटे शिजवावे. पालक थोडा मऊ झाल्यावर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून आणखी काही वेळ शिजवावे.
या पाच सूपपैकी गाजर-अद्रक आणि मिक्स व्हेज ही दोन सूपही हिवाळ्यात उत्तम पर्याय ठरतात. थंडीच्या दिवसांत ही गरमागरम सूप घरी सहज तयार करता येतात आणि कुटुंबातील सर्वांसाठी पौष्टिक ठरतात.
प्रतिक्रिया व्यक्त करा