धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तरुण वयातच मानदुखी आणि पाठदुखीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. आकडेवारीनुसार, ८० टक्के लोकांना आयुष्यात किमान एकदा तरी मानदुखीचा त्रास होतो. पाठदुखी ही केवळ स्नायूंच्या ताणामुळे होते आणि विश्रांतीने बरी होईल, असे अनेकांना वाटते. मात्र पाठदुखीसोबत पायात अशक्तपणा, मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवत असेल तर ते मणक्याच्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
मणक्याचे आजार होण्याची प्रमुख कारणे
मणक्याच्या चकतीमधील मऊ गर बाहेरच्या आवरणातून बाहेर येऊन जवळच्या मज्जातंतूच्या मुळावर तणाव येतो. यामुळे पायात तीव्र वेदना होणे, मुंग्या येणे, सुन्नपणा किंवा अशक्तपणा अशी लक्षणे दिसू लागतात. लंबर स्पाइनल स्टेनोसिसमध्ये मणक्याचे हाड अरुंद झाल्यामुळे पायांकडे जाणाऱ्या मज्जातंतूंवर जास्तीचा तणाव येतो. त्यामुळे दोन्ही पायांमध्ये उभे राहताना किंवा चालताना वेदना होतात. स्पॉन्डिलोलिस्थेसिसमध्ये मणक्याचे एक हाड खालच्या हाडावरून पुढे सरकते, ज्यामुळे शेजारच्या मज्जातंतू दाबल्या जातात. यामुळे कंबरदुखीसोबतच पायात अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय फ्रॅक्चर, स्पाइनल ट्यूमर, कॉडा इक्विना सिंड्रोम आणि स्पाइनल ऑस्टियोमायलाइटिस यांसारख्या गंभीर आजारांमुळेही पाठदुखी होते.
ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांना भेटा
वीस वर्षांपेक्षा कमी किंवा सत्तर वर्षांपेक्षा जास्त वयात सुरू झालेली पाठदुखी शरीरासाठी घातक ठरू शकते. अपुऱ्या विश्रांतीनंतरही सहा आठवड्यांपेक्षा जास्त वेळ पाठदुखी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कॅन्सर किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे, ऑस्टियोपोरोसिस, तोंडावाटे स्टिरॉइड्सचा दीर्घकाळ वापर आणि शरीराची संवेदना किंवा हालचालींची क्षमता हळूहळू कमी होणे हीदेखील धोक्याची लक्षणे आहेत. लघवी करताना नवीन अडचण येणे, लघवी अडकून राहणे किंवा नकळत लघवी व शौच होणे अशी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याऐवजी घरीच उपाय करतात, मात्र चुकीच्या उपायांमुळे शरीराला हानी पोहोचण्याची शक्यता असते.
प्रतिक्रिया व्यक्त करा