भारतातील किल्ले हे देशाच्या समृद्ध इतिहासाचे आणि स्थापत्यकलेचे प्रतीक आहेत. काही किल्ले उंच डोंगरांवर बांधलेले आहेत, तर काही वाळवंटाच्या मध्यभागी किंवा समुद्रकिनाऱ्यावर वसलेले आहेत. त्यांची भव्य तटबंदी, राजवाडे, गुप्त मार्ग आणि सुंदर नक्षीकाम पाहून पर्यटक थक्क होतात. हिवाळ्यातील प्रवासासाठी भारतातील पाच भव्य किल्ल्यांची ओळख करून घेऊया.
राजस्थानचे तीन शाही किल्ले
जोधपूरमधील मेहरानगड किल्ला उंच डोंगरावर वसलेला आहे. राव जोधा यांनी १४५९ मध्ये त्याची उभारणी केली. जमिनीपासून सुमारे १२५ मीटर उंचीवर असलेल्या या किल्ल्यात मोती महाल, फूल महाल आणि शीश महाल यांसारखे सुंदर राजवाडे आहेत. किल्ल्यावरून संपूर्ण निळ्या जोधपूर शहराचे विहंगम दृश्य दिसते.
जयपूरजवळील आमेर किल्ला राजा मानसिंह प्रथम यांनी १६व्या शतकात बांधायला सुरुवात केली. लाल वाळूचा दगड आणि संगमरवर वापरून बांधलेल्या या किल्ल्यात दिवाण-ए-आम, दिवाण-ए-खास, सुख निवास आणि प्रसिद्ध शीश महाल आहेत. शीश महालातील असंख्य छोट्या आरशांमुळे दिव्याचा छोटासा प्रकाशही सुंदर चमक निर्माण करतो. किल्ल्याजवळील माओटा सरोवर आणि डोंगररांगा परिसराचं सौंदर्य वाढवतात.
थार वाळवंटातील जैसलमेर किल्ला ११५६ मध्ये रावल जैसल यांनी बांधला. पिवळ्या वाळूच्या दगडांपासून बांधलेला हा किल्ला सूर्यप्रकाशात सोन्यासारखा चमकतो, म्हणून त्याला ‘सोनार किल्ला’ असंही म्हटलं जातं. या किल्ल्याचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे आजही येथे लोकवस्ती आहे. किल्ल्याच्या आत घरे, दुकाने, हॉटेल्स, मंदिरे आणि बाजारपेठा आहेत, त्यामुळे हा केवळ ऐतिहासिक किल्ला नसून एक जिवंत वारसास्थळ आहे. राजस्थानच्या डोंगरी किल्ल्यांमध्ये जैसलमेर किल्ल्याचाही समावेश असून, तो युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत आहे.
गोलकोंडा आणि चित्तोडगड
हैदराबादजवळील गोलकोंडा किल्ला सुरुवातीला काकतीय राजवटीच्या काळात मातीचा किल्ला होता. पुढे कुतुबशाही राजांनी त्याचा विस्तार करून त्याला भव्य दगडी किल्ल्याचं रूप दिलं. या किल्ल्याचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची ध्वनी व्यवस्था. मुख्य प्रवेशद्वाराजवळ टाळी वाजवल्यास तिचा आवाज वरच्या भागापर्यंत ऐकू जातो, असं सांगितलं जातं. पूर्वी शत्रूंच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी या व्यवस्थेचा उपयोग केला जात असे. प्रसिद्ध कोहिनूर हिऱ्याशीही गोलकोंडा परिसराचा ऐतिहासिक संबंध आहे.
राजस्थानमधील चित्तोडगड किल्ला सुमारे ७०० एकरांहून अधिक परिसरात पसरलेला असून, तो भारतातील सर्वांत मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. मेवाडच्या राजपूत शासकांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या या किल्ल्यात विजय स्तंभ, कीर्ती स्तंभ, राणा कुंभा महाल, पद्मिनी महाल आणि अनेक प्राचीन मंदिरे आहेत. महाराणा कुंभा यांनी बांधलेला विजय स्तंभ हे या किल्ल्याचं प्रमुख आकर्षण आहे. या किल्ल्याचा संबंध राणी पद्मिनीच्या कथेशी आणि राजपूतांच्या जौहराच्या घटनांशी जोडला जातो.
प्रतिक्रिया व्यक्त करा