ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात दोन्ही बाळांना सांभाळताना सायली-अर्जुनची चांगलीच तारांबळ उडाली. मध्यरात्र झाली तरीही दोन्ही मुली झोपायला तयार नव्हत्या, त्यामुळे सायली आणि अर्जुनलाही झोप मिळाली नाही. दोघांनीही त्यांना झोपवण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्या काही ऐकत नव्हत्या. दुसऱ्या दिवशी अर्जुन ऑफिसमध्ये पेंगत होता. त्याच्यासमोर त्याचे क्लायंट आलेले होते, पण दोन्ही बाळांनी रात्रभर झोप न दिल्यामुळे अर्जुनचे कामात लक्ष लागत नव्हते. त्यामुळे क्लायंट त्याच्यावर नाराज झाले. तिथे चैतन्य असल्यामुळे थोड्याफार गोष्टी सांभाळल्या गेल्या. क्लायंट निघून गेल्यावर चैतन्य अर्जुनला दुसरे काम सांगत होता, पण तितक्यात त्याला आठवले की दोन्ही बाळांना घेऊन रुग्णालयात जायचे आहे. त्यामुळे तो आपले काम चैतन्यवर सोपवून तसाच निघून गेला.
दोन्ही बाळांचे रुग्णालयातील तपासणी
सायली घरात सांगते की आज दोन्ही बाळांची तपासणी आहे, त्यामुळे ती रुग्णालयात जात आहे. दोघांना एकटीने कसे सांभाळणार, असा प्रश्न कल्पना विचारते, पण सायली निभावून घेईन असे सांगते. श्वेता तिच्यासोबत जाते असे म्हणते, पण सायली तिला येऊ देत नाही. सोबतीला विमल असते, त्यामुळे तिला थोडा आधार असतो. रुग्णालयात गेल्यावर समजते की, एका बाळाला सतत जुलाब होत असतात, तर दुसऱ्या बाळाचे पोट अजिबातच साफ होत नसते. तेव्हा डॉक्टर त्यांना औषध देतात आणि एका बाळाच्या मलाचे फोटो पाठवायला सांगतात. हे ऐकून अर्जुनला कसंतरी वाटते.
श्वेताच्या मनात विष कालवले
सायली रुग्णालयात गेल्यावर श्वेता लगेचच महिपत आणि प्रियाला फोन लावते. तिला सचिनला कधी सोडवणार, याबाबतची माहिती हवी असते. पण वकील सांगतात की सचिनला सोडवणे खूप कठीण आहे, कारण त्यांच्या विरोधातले पुरावे खूप मजबूत आहेत. यात श्वेताला भडकवायला प्रिया बोलते की कदाचित सायली-अर्जुनने जाणूनबुजून खोटे पुरावे तयार केले आहेत, त्यामुळेच ही केस आणखी अवघड झाली आहे. इन्स्पेक्टर सावंत सचिनला आणखी कशी शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न करत आहेत. हे सर्व ऐकून श्वेताच्या मनात सायली-अर्जुनबद्दलचा राग आणखी वाढतो. ती त्यांच्या बाळांना त्रास देऊन सूड उगवायचा ठरवते. महिपत आणि प्रियाला हेच हवे असते. आता श्वेता पुढे काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा