रात्री झोपायच्या वेळी पायात विचित्र अस्वस्थता जाणवणं, पाय सतत हलवावेसे वाटणं — ही लक्षणं अनेकांना त्रासदायक ठरतात. हा केवळ थकवा किंवा साधं गोळं येणं नसून, रेस्टलेस लेग सिंड्रोम नावाचा मज्जासंस्थेशी संबंधित विकार असू शकतो. विश्रांतीच्या वेळी आणि संध्याकाळी-रात्री हा त्रास अधिक जाणवतो, त्यामुळे शांत झोप घेणं कठीण होतं.
गोळे येणं आणि रेस्टलेस लेग सिंड्रोम यात फरक काय?
स्नायूचा गोळा म्हणजे प्रामुख्याने पोटरीच्या स्नायूमध्ये होणारं वेदनादायक आकुंचन. तर रेस्टलेस लेग सिंड्रोममध्ये पाय हलवण्याची आवरता न येणारी इच्छा होते. त्यासोबत पायात काहीतरी सरकत असल्यासारखं वाटणं, मुंग्या येणं, ओढल्यासारखं वाटणं, दुखणं किंवा अस्वस्थता अशा संवेदना जाणवतात. पाय हलवले किंवा चाललं की या लक्षणांपासून तात्पुरता आराम मिळतो. रात्री वारंवार पोटरीत गोळे येण्यामागे पाण्याची कमतरता, बराच वेळ चालणं किंवा धावणं, काही औषधं, मज्जासंस्थेचे इतर विकार किंवा कुपोषण यांसारखी विविध कारणं असू शकतात.
लोह आणि डोपामाइनचा संबंध काय?
काही व्यक्तींमध्ये या विकाराचा संबंध शरीरातील लोहाची पातळी कमी असण्याशी जोडला जातो. हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या डोपामाइन या मेंदूतील रसायनाच्या योग्य कार्यासाठी लोह अत्यंत आवश्यक असतं. स्पष्टपणे रक्ताची कमतरता नसतानाही शरीरात किंवा मेंदूत लोहाचे साठे कमी असू शकतात. डोपामाइन स्नायूंच्या हालचाली आणि झोपेचं चक्र नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. हा विकार केवळ डोपामाइनच्या साध्या कमतरतेमुळे होत नाही, तर मेंदूतील डोपामाइनच्या मार्गांचं अनियंत्रित किंवा कमी झालेलं कार्य हे त्यामागील मुख्य कारण मानलं जातं. खनिजे किंवा जीवनसत्त्वांची कमतरता गोळे येण्याशी संबंधित असू शकते, पण ती नेहमीच या विकाराचं कारण असेल असं नाही. त्यामुळे निदान झाल्याशिवाय स्वतःच्या मनाने कोणतीही सप्लिमेंट्स घेऊ नयेत; लक्षणं कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.
प्रतिक्रिया व्यक्त करा