भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ मोठ्या अडचणीत सापडला होता. न्यूझीलंडने पहिल्या डावात ३५६ धावा उभारल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय फलंदाजी कोलमडली आणि संघ ११७ धावांवर ७ बाद झाला. या परिस्थितीत शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघावर फॉलोऑनचे संकट ओढवले होते. मात्र ध्रुव जुरेल, आकाश दीप आणि गुरनूर ब्रार यांनी खालच्या फळीत महत्त्वाची भागीदारी करत संघाला त्या संकटातून बाहेर काढले.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताची धावसंख्या ६ बाद ११६ अशी होती. पहिल्याच सत्रात अंशुल कंबोजला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर ध्रुव जुरेल आणि आकाश दीप यांनी डाव सावरण्याची जबाबदारी घेतली. दोघांनी आठव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर भारताने १५७ धावांचा टप्पा गाठला आणि फॉलोऑनचे संकट टळले. आकाश दीपने चार चौकारांच्या मदतीने २९ धावा केल्या. त्यानंतर त्याचा डाव संपुष्टात आला.
जुरेलची झुंजार खेळी
आकाश दीप बाद झाल्यानंतर जुरेलला गुरनूर ब्रारची साथ मिळाली. दोघांनी संयमी फलंदाजी करत भारताची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली. दरम्यान जुरेलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक पूर्ण केले. जुरेल ५५ धावांवर, तर गुरनूर ब्रार ७ धावांवर नाबाद आहे. दोघांमध्ये नवव्या विकेटसाठी ४३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली आहे. लंचपर्यंत भारताचा संघ १५० धावांनी पिछाडीवर आहे. आता शेवटच्या दोन फलंदाजांकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा असेल.
दुसऱ्या दिवशी काय घडले होते
दुसऱ्या दिवसाची सुरुवात न्यूझीलंडने ५ बाद २४६ धावांवरून केली होती. टॉम ब्लंडेल आणि ग्लेन फिलिप्स मैदानात होते. दिवसाच्या सुरुवातीलाच आकाश दीपने ग्लेन फिलिप्सला ३६ धावांवर बाद केले. मात्र त्यानंतर ब्लंडेलने खालच्या फळीतील फलंदाजांच्या साथीने न्यूझीलंडचा डाव सावरला. ब्लंडेलने ८९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. नॅथन स्मिथने २६, तर काईल जेमिसनने १९ धावांचे योगदान दिले. आकाश दीपने शानदार गोलंदाजी करत ५ बळी घेतले आणि न्यूझीलंडचा पहिला डाव ३५६ धावांवर संपवला. दुसरीकडे जसप्रीत बुमराहला एकही बळी मिळवता आला नाही.
प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोठी खेळी करण्याची संधीच दिली नाही. यशस्वी जैस्वाल खाते न उघडताच माघारी परतला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि केएल राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३३ धावा जोडल्या. मात्र काईल जेमिसनने पडिक्कलला २१ धावांवर बाद केले. त्यानंतर शुभमन गिल १७ धावा करून माघारी परतला. ऋषभ पंतने २३ धावा करत आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र जेकब डफीने त्याला बाद केले. डफीनेच केएल राहुलची २५ धावांची खेळी संपवली. त्यानंतर नॅथन स्मिथने वॉशिंग्टन सुंदरला १० धावांवर बाद केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ६ बाद ११६ अशी होती आणि ध्रुव जुरेल ७ धावांवर नाबाद होता.
प्रतिक्रिया व्यक्त करा