ऋषभ पंतने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याने जेकब डफीच्या गोलंदाजीवर षटकार खेचत इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स याला मागे टाकले. पंतच्या नावावर आता या स्पर्धेत ८९ षटकार झाले आहेत.
क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या निर्णायक कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय डावाच्या २५ व्या षटकात पंतने हा विक्रमी षटकार मारला. त्याआधी २५ चेंडू त्याने एकही चौकार-षटकार मारला नव्हता. डफीचा चेंडू त्याने लाँग-ऑनच्या दिशेने सीमारेषेबाहेर पाठवला.
स्टोक्सचा विक्रम मोडला; पंत अव्वल स्थानी
पंतने ४४ सामन्यांतील ७६ डावांत ८९ षटकार मारले आहेत. स्टोक्सने ६४ सामन्यांतील ११७ डावांत ८८ षटकार मारले होते. या यादीत रोहित शर्मा ५६ षटकारांसह तिसऱ्या, शुभमन गिल ४८ षटकारांसह चौथ्या, तर यशस्वी जैस्वाल ४५ षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.
एकूण कसोटी क्रिकेटमध्येही पंत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ५४ कसोट्यांत १०९ षटकार मारले आहेत. या यादीत १३८ षटकारांसह स्टोक्स अजूनही अव्वल स्थानी आहे.
विक्रम झाला, पण मोठी खेळी जमली नाही
विक्रमानंतर मात्र पंतची खेळी फार काळ टिकली नाही. त्याने ३९ चेंडूंत २३ धावा केल्या. त्याच्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार होता. डफीच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला आणि काइल जेमिसनने त्याचा झेल घेतला. न्यूझीलंडने पहिल्या डावात ३५६ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सहा गडी गमावून ११६ धावा केल्या होत्या.
प्रतिक्रिया व्यक्त करा