देशात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून घमासान सुरू असून काँग्रेसने या विधेयकाला जोरदार विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांना टोला लगावला आहे. सतेज पाटील यांनी राहुल गांधी यांना फोन करून डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा द्यायला सांगावं, असं मुश्रीफ म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुष्काळाबाबतच्या मेळाव्यात बोलताना मुश्रीफ यांनी काँग्रेस आणि सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपासून या दोन्ही नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याचं चित्र आहे. मुश्रीफ यांनी यावेळी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे आभार मानले. या विधेयकामुळे महिलांना मोठी संधी मिळेल, असं ते म्हणाले. मतदारसंघ मोठे असल्याने लोकप्रतिनिधींना फिरणं अवघड होतं; आता ती समस्या सुटण्यास मदत होईल, असं मुश्रीफ यांनी सांगितलं. शरद पवार यांचा पक्ष भविष्यात महायुतीत येईल की नाही, हे माहिती नाही, मात्र विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असं मुश्रीफ म्हणाले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा मुश्रीफ यांनी निषेधही व्यक्त केला.
के पी पाटील यांनी सरकारला घरचा आहेर
याच कार्यक्रमात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारला घरचा आहेर दिला. शक्तिपीठासाठी जमीन देण्यासाठी कोल्हापुरातील शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जात असल्याचं सांगत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुश्रीफ यांच्या उपस्थितीतच के. पी. पाटील सरकारवर टीका करू लागले, तेव्हा मुश्रीफ यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, “मुश्रीफ साहेब, बोलू द्या,” असं म्हणत माजी आमदाराने सरकारवर टीका सुरूच ठेवली.
प्रतिक्रिया व्यक्त करा