३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडलं जाणार आहे. या विधेयकावरून देशाच्या राजकारणात घडामोडी वेगवान झाल्या आहेत. मतदारसंघ फेररचनेला आतापर्यंत आक्रमक विरोध करणाऱ्या दक्षिण भारतातील राजकीय पक्षांनी भूमिका बदलत विधेयकाला पाठिंबा दिला आहे. द्रमुक, तेलुगु देसम, वायएसआरसीपी, भारत राष्ट्र समिती आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पाच पक्षांनी विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे.
विधेयकात नेमकं काय आहे?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभेत परिसीमन (दुसरे) विधेयक, २०२६ मांडण्याबाबत विचार करण्याची शिफारस केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी या विधेयकाला मंजुरी दिली आहे. या विधेयकात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील लोकसभेच्या तसेच विधानसभांच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.
दक्षिणेच्या राज्यांना काय मिळणार?
तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक घेतल्यानंतर विधेयकाचं समर्थन जाहीर केलं. नव्या विधेयकात पक्षाच्या दोन मागण्यांचा समावेश झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक राज्यात ५० टक्के जागा वाढवण्याचा निर्णय हा दक्षिणेतील राज्यांचा विजय असल्याचं द्रमुकच्या नेत्यांनी म्हटलं आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी डिलिमिटेशन हे पंतप्रधान मोदींचं ऐतिहासिक पाऊल असून सर्वांसाठी फायद्याचं असल्याचं म्हटलं आहे. केवळ लोकसंख्येच्या आधारे परिसीमन झालं असतं तर दक्षिणेच्या राज्यांचं नुकसान झालं असतं, मात्र ५० टक्के वाढीमुळे ती शंका दूर झाल्याचं त्यांनी सांगितलं. दक्षिण भारतातील पाच राज्यांच्या जागा १२९ वरून १९५ वर जातील आणि दक्षिणेचा २३.७६ टक्के वाटा सुरक्षित राहील. आंध्र प्रदेशच्या जागा २५ वरून ३८, तामिळनाडूच्या ५९, कर्नाटकच्या ४२, तेलंगाणाच्या २६ आणि केरळच्या ३० होतील. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष के. टी. रामा राव यांनी दक्षिणेची २४ टक्के भागीदारी सुरक्षित राहणार असल्याच्या आशेवर पाठिंबा देत असल्याचं म्हटलं. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी २०५१ पर्यंत सध्याची टक्केवारी कायम ठेवून ५० टक्के वाढ केल्याने लोकशाही भक्कम होईल, असं म्हटलं. वायएसआरसीपीनेही पाठिंबा जाहीर केला आहे. जनता दलाचे नेते आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी एनडीएचे मित्रपक्ष म्हणून परिसीमन आणि महिला आरक्षणाच्या विधेयकाचं समर्थन केलं आहे. दक्षिणेतील पक्षांच्या १२९ पैकी ७५ खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा