घराच्या परसातील झाडावरचे नारळ लोखंडी पाइपने पाडताना पाइपचा स्पर्श वीजेच्या तारांना झाल्याने पती-पत्नीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील संगरगाळी गावात शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
सालू शावेर मस्करेन (वय ७०) आणि त्यांच्या पत्नी मिलाग्रीन सालू मस्करेन (वय ६५) अशी मृतांची नावे आहेत. पतीला विजेचा धक्का बसल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या पत्नीचाही वीजेने बळी घेतला.
अकरा हजार व्होल्टची वाहिनी झाडाजवळून
मस्करेन दाम्पत्याची संगरगाळी गावात दोन घरे आहेत. त्यांचा मुलगा कामानिमित्त गोव्यात राहतो. चव्हाटा मंदिराजवळील नव्या घरात ते राहत होते, तर जुन्या घराच्या परसात नारळाची झाडे आहेत. शनिवारी दुपारी सुमारे साडेबारा वाजता सालू नारळ काढण्यासाठी गेले होते. पत्नी मिलाग्रीनही त्यांच्यासोबत होत्या.
झाडाजवळून अकरा हजार व्होल्ट क्षमतेची उच्चदाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. नारळ काढताना अचानक त्यांच्या हातातील लोखंडी पाइपचा वीजभारित तारेला स्पर्श झाला. क्षणात विजेचा तीव्र झटका बसल्याने सालू मस्करेन पाइपला चिकटून राहिले. पतीला तडफडताना पाहून पत्नीने त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली; मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसला. दुर्घटनेत सालू मस्करेन यांचा मृतदेह पूर्णपणे भाजल्याने ओळख पटवणेही कठीण झाले होते.
गावावर शोककळा
घटनेची माहिती मिळताच खानापूरचे पोलीस निरीक्षक एल. एच. गवंडी आणि पोलीस उपनिरीक्षक निरंजन स्वामी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह खानापूर सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
मस्करेन दाम्पत्याच्या पश्चात एक मुलगा आहे. आई-वडिलांचे छत्र एकाच वेळी हरपल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वीज वाहिन्यांजवळ काम करताना असलेल्या धोक्याची जाणीव या दुर्घटनेने पुन्हा एकदा करून दिली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा