, २९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

काळ्या पाण्यापासून विधवांना वाचवणारे फुलेंचे गृह

१८६३ मध्ये महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. विधवा महिलांना काळ्या पाण्यापासून वाचवणे आणि मुलांना जगण्याची संधी देणे हाच उद्देश होता.

काळ्या पाण्यापासून विधवांना वाचवणारे फुलेंचे गृह

महात्मा जोतिराव फुले यांना आपण सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, शिक्षणाचे प्रणेते, जातिव्यवस्थेचे कठोर टीकाकार आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक म्हणून ओळखतो. मात्र स्त्रियांच्या, विशेषतः विधवा महिलांच्या मुक्तीसाठी त्यांनी केलेले कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. या कार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी १८६३ मध्ये पुण्यात स्थापन केलेले बालहत्या प्रतिबंधक गृह. या गृहामुळे अनेक असहाय्य महिलांना सामाजिक छळ, अनिच्छित गर्भधारणा आणि त्यातून उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांपासून संरक्षण मिळण्याचा मार्ग उपलब्ध झाला.

काळे पाणी म्हणजे काय?

काळे पाणी म्हणजे भारतीय कैद्यांना समुद्र ओलांडून अंदमान-निकोबार बेटांवर पाठवून जन्मठेप किंवा दीर्घकाळ कारावासाची शिक्षा भोगायला लावणे. त्या काळात समुद्र ओलांडणे म्हणजे जात, कुटुंब आणि आपल्या समाजाशी असलेले संबंध गमावणे, अशी धारणा होती. त्यामुळे या शिक्षेला काळे पाणी असे म्हटले जाई. १८५७ च्या उठावानंतर पोर्ट ब्लेअर येथे ब्रिटिशांनी दंडवसाहत सुरू केली. या वसाहतीत कैद्यांना अत्यंत अमानुष परिस्थितीत राहावे लागायचे. तेलघाणीतून दररोज सुमारे ३० पौंड तेल काढण्याची सक्ती, नारळाच्या काथ्या कुटणे, चाबकाचे फटके, बेड्या आणि हातकड्या घालून उभे ठेवणे, एकांतवास आणि जंगलतोड अशा कठोर शिक्षांचा त्यांना सामना करावा लागत होता. दंडवसाहत सुरू झाल्यानंतर १८६० च्या सुमारास महिला कैद्यांनाही अंदमानला पाठवले जाऊ लागले. यातील बहुतेक महिला सामान्य गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या होत्या. खून, अर्भकहत्या, व्यभिचाराशी संबंधित गुन्हे, चोरी आणि दरोडा हे त्यांच्यावरील प्रमुख आरोप होते. यातील अनेक प्रकरणांच्या मुळाशी कौटुंबिक अत्याचार आणि सामाजिक दबाव असल्याचे दिसून येते. या महिला कैद्यांना सेल्युलर जेलमध्ये न ठेवता स्वतंत्र महिला बराकींमध्ये ठेवले जात असे. त्यांच्याकडून शिवणकाम आणि धुणीभांडी यांसारखे श्रम करून घेतले जात असत. दंडवसाहत स्थिर करण्यासाठी पुरुष आणि महिला कैद्यांचे विवाह लावण्याचे धोरणही होते. अनेकदा हे विवाह महिलांच्या इच्छेविरुद्ध होत असत. महिला कैद्यांचे लैंगिक शोषण आणि त्यांच्यातील उच्च मृत्युदर यांचाही इतिहासकारांनी उल्लेख केला आहे.

बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना

अशा अमानुष परिस्थितीत महिलांना अंदमानला जाण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांना सामाजिक संरक्षण मिळवून देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले यांनी पुण्यात १८६३ मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्या काळात स्त्रियांची सामाजिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांना सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय स्वातंत्र्य नव्हते. बहुसंख्य महिलांना शिक्षणाचा अधिकारही नव्हता. बालविवाह आणि जरठ-कुमारी विवाह यांसारख्या प्रथांमुळे अनेक मुली अगदी लहान वयातच विधवा होत होत्या. विधवा झाल्यानंतर त्यांना नरकापेक्षाही हीन जीवन जगावे लागत असे. १८५६ मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा संमत झाला होता. मात्र कायदा झाल्यानंतरही विधवा महिलांच्या सामाजिक स्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. बहुसंख्य समाजाला विधवा पुनर्विवाहाची कल्पना मान्य नव्हती. जरठ-कुमारी विवाहाच्या प्रथेत लहान वयातील मुलींचे लग्न त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने मोठ्या वयाच्या पुरुषांशी लावले जात असे. मुलगी वयात येईपर्यंत अनेकदा त्या पुरुषाचे वृद्धापकाळाने निधन होत असे. परिणामी कोणताही दोष नसताना त्या अल्पवयीन मुलीला वैधव्य स्वीकारावे लागे. अशा परिस्थितीत काही वेळा तिच्या असहायतेचा गैरफायदा घेतला जात असे. विधवा महिलेने गर्भवती होणे हा त्या काळातील समाजाच्या दृष्टीने मोठा अपराध मानला जात असे. गर्भधारणा झाल्यानंतर या महिलांसमोर आत्महत्या करणे किंवा गर्भपात करणे याशिवाय दुसरा पर्याय उरत नसे. काही वेळा नवजात बालकांची हत्या करण्यासारख्या टोकाच्या घटनाही घडत असत. अशा महिलांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या मुलांना जगण्याची संधी मिळावी यासाठी महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. या कार्याची प्रेरणा समाजसुधारक बेहरामजी मेरवानजी मलबारी यांच्या एका उपक्रमातून मिळाल्याची नोंद आहे. मलबारी यांनी बालविवाह आणि लादलेले वैधव्य या विषयांवर दोन टिपणे मे-जून १८८४ मध्ये तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांच्याकडे पाठवली होती. ११ नोव्हेंबर १८८४ रोजी ही टिपणे काही नामवंत समाजसुधारकांकडे त्यांची मते जाणून घेण्यासाठी पाठवण्यात आली. त्यावर आपले मत व्यक्त करताना महात्मा जोतिराव फुले यांनी विधवा महिलांच्या दुर्दशेचे वर्णन केले. यावेळी त्यांनी आपले मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या काशीबाई या ब्राह्मण बालविधवेची कहाणी सांगितली. काशीबाईने नवजात बालकाची हत्या केल्याच्या आरोपावरून सत्र न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणूनही संबोधले जात असे. काशीबाईच्या या प्रसंगाने महात्मा फुले व्यथित झाले. विधवा महिलांनी समाजाच्या भीतीपोटी आपल्या मुलांची हत्या करू नये, तर नवजात बालकांना आपल्या स्वाधीन करावे, असे आवाहन त्यांनी केले. गोवंडे यांच्या घरी घडलेल्या काशीबाईच्या प्रसंगानंतर महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात स्वखर्चाने बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. या कार्यात सावित्रीबाई फुले यांनी त्यांना सर्वतोपरी मदत केली. किंबहुना या गृहाचे संपूर्ण कामकाज सावित्रीबाई फुले यांनीच सांभाळले. विधवा महिलांना सुरक्षितपणे बाळंत होण्याची संधी देणे, त्यांच्या मुलांना जगण्याचा अधिकार मिळवून देणे आणि त्यांची ओळख गुप्त ठेवणे, या माध्यमातून फुले यांनी त्या काळातील सामाजिक व्यवस्थेला थेट आव्हान दिले. त्यामुळे बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना ही केवळ अनाथ मुलांच्या संगोपनापुरती मर्यादित नव्हती, तर ती विधवा महिलांना सामाजिक अन्यायातून बाहेर काढण्याची एक महत्त्वाची चळवळ होती. या गृहात एकूण ३५ मुले होती. यातील काही मुले १० ते १२ वर्षांपर्यंत जगली, अशी नोंद आहे. या मुलांपैकी यशवंत हेच जिवंत राहिले. यशवंतरावांना पुढे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतले. यशवंतराव पुढे फौजेत डॉक्टर म्हणून मोठ्या हुद्द्यावर कार्यरत झाले. नोकरीच्या निमित्ताने ते चीन आणि काबूल येथेही गेले. पुढे पुण्यात प्लेगची साथ पसरली तेव्हा ते पुन्हा पुण्यात परतले. या काळात त्यांनी आणि सावित्रीबाईंनी प्लेगग्रस्त जनतेची मोठी सेवा केली. महात्मा फुले यांच्या प्रेरणेने मुंबईतील लालशंकर उमाशंकर याज्ञिक यांनी पंढरपूर येथे अनाथाश्रम सुरू केले. महात्मा फुले यांचे स्त्रियांसाठीचे कार्य केवळ बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या स्थापनेपुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या या कार्यातून पुढे अनेकांनी प्रेरणा घेतली. राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानाच्या माध्यमातून हे कार्य पुढे नेले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्त्रियांना समानतेचे आणि अधिकारांचे कायदेशीर संरक्षण मिळवून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे योगदान दिले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance